रत्नागिरी/ प्रतिनिधी:- रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी येथील पत्रकार जाकादेवी वार्ताहर, तसेच जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक संतोष रामचंद्र पवार आणि त्यांचे बंधू सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार किशोर रामचंद्र पवार यांच्या मातोश्री सुमन रामचंद्र पवार ( ७९ )यांचे बुधवार दि. २७ मार्च रोजी अल्पशा आजाराने रत्नागिरी येथे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
सुमन रामचंद्र पवार या अतिशय प्रेमळ, हसतमुख, मनमिळावू प्रचंड मेहनती होत्या. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात माणसे जोडण्याचे काम केले. तसेच आपल्या पतीच्या साह्याने त्यांनी अपार कष्ट करून संसाराचा गाडा उभा केला, त्यांनी आपल्या चारही मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन स्वावलंबी बनविले.तसेच त्यांच्यावर आदर्शवत संस्काराचे बीज पेरून त्यांना धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीचे धडे दिले.त्या कळझोंडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ११च्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या .कळझोंडी येथील महिला मंडळाच्या अतिशय उल्लेखनीय कार्य केले.त्यांचे पती रामचंद्र पवार यांनी ही एकेकाळी कळझोंडी गाव शाखेचे अध्यक्ष पद निष्ठेने सांभाळले. त्यांनी काम करताना आपल्या सत्कार्याने समाजात मानाचे स्थान कमावले.
त्यांच्या आकस्मिक निधनाची वार्ता समजताच त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी धार्मिक ,सामाजिक ,शैक्षणिक व विविध स्तरातील मंडळी , त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि मोठ्या संख्येने लहानथोर बंधुभगिनी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे,दोन मुली, सुना, नातवंडे, जावई,पुतणे असा मोठा परिवार आहे . त्यांचा जलदान विधी कार्यक्रम मंगळवार दि.२ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे शाखेतर्फे सांगण्यात आले आहे.दिवंगत सुमन रामचंद्र पवार यांना मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांतर्फे व कळझोंडी कमिटीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.