कोल्हापुरातुन चिपळुणात प्रेमविवाह करून पळून आलेल्या दाम्पत्याची हृदय हेलावणारी घटना
चिपळूण:-हृदय पिळवटून टाकणारी घटना चिपळुणात घडली आहे. आधी प्रेम विवाह करून पळून आली. त्यानंतर आजारपणाने पतीने आत्महत्या केल्याचे दुःख सहन न झाल्याने पत्नीनेही अवघ्या काही तासातच आपले जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी चिपळुणात घडली. अवघ्या सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या पती-पत्नीचा असा शेवट झाल्याने शोक व्यक्त होत आहे. हे दाम्पत्य मूळचे कोल्हापूरचे होते.
पोलिसांनी माहितीनुसार, कोल्हापूर येथील शरद पाटील (४२) यांनी स्वाती (४०) हिच्यासोबत सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र हे लग्न त्यांच्या घरच्यांना मान्य नव्हते. नातेवाईकांनी या दोघांकडे पाठ फिरवली. त्यामुळे शरद आणि स्वाती यांनी कोल्हापूर सोडून थेट चिपळूण गाठले. चिपळूणमधील पिंपळी येथे ते भाड्याने वास्तव्य करू लागले. मिळेल ते काम करत आपल्या संसाराचा गाडा हाकण्यास सुरुवात केली. मात्र, वर्षभरापूर्वी अचानकपणे शरद हे मणक्याच्या दुखण्याने अंथरूणाला खिळले. पुढे त्यांना अपंगत्व आल्याने ते अंथरुणावरच होते. त्यामुळे संसाराचा सर्व भार स्वाती यांच्यावर आला होता. तरीदेखील धुणीभांडी करून त्या शरद यांचे पालपोषण करत होत्या. मृत स्वाती यांचे एमएबीएडपर्यंतचे शिक्षण झाले होते मात्र शरद पाटील यांचे ११ वीपर्यंत शिक्षण झालेले होते. स्वाती यांनी काहीकाळ गावात शिक्षक म्हणून नोकरी केली होती. प्रेमविवाहामुळे थेट चिपळुणात आल्यानंतर शरद यांनी हमालीचे काम केले.
दरम्यान, आपण अंथरुणावर आहोत आणि पत्नी स्वातीवर पडत असलेला भार लक्षात घेऊन शरद हे जगण्याला कंटाळले होते. ते नेहमीच जीवन संपवायचे आहे असे सतत म्हणत असत. तर प्रेमविवाहामुळे शरद यांने जीवन संपवल्यास आपणहीं जगणार नाही असे देखील त्या दोघांमध्ये चर्चा होत असे. शेवटी एक दिवस शरद यांनी फिनेल प्राशन करून आत्महत्या केली. पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पतीच्या मागे आता जगायचे कुणासाठी असा विचार करत स्वाती यांनीही कॅनॉलच्या पाण्यात उडी घेतली. मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खेर्डी नादीपात्रात एका महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. काही अंतरावर असलेल्या कॅनलवर येथे उडी मारुन आत्महत्या केली असावी असा अंदाजानुसार पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाडिक यांनी या कॅनल परिसरात त्या महिलेचा शोध घेतला असता त्या सुर्वे चाळीतील रहीवाशी असल्याची माहिती पुढे आली. त्याच दरम्यान सुर्वे चाळीत शरद पाटील यांनीही फिनेल प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार पोलिसांना समजला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार शरद पाटील यांच्या आत्महत्येचा धक्का स्वाती यांना सहन न झाल्याने त्या राहत असलेल्या सुर्वे चाळीपासून काही अंतरावर असलेल्या पिंपळी कॅनलमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसानी शरद यांच्या नातेवाईकांना दिल्यानंतर ते मंगळवारी रात्रीच चिपळुणात दाखल झाले. कामथे उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनानंतर त्या दोघाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. बुधवारी येथील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाडिक करत आहेत.