जागा खरेदी करणाऱ्या वकिलाकडून पोलिसात तक्रार
खेड:-तालुक्यातील मुंबके येथील कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याची मालमत्ता खरेदी करत घराच्या समोरील शेतात आंब्याच्या झाडाखाली होमहवनासाठी ठेवलेले 9400 रूपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार जागा खरेदी करणाऱ्या भुपेंद्रकुमार भारद्वाज यांनी येथील पोलीस स्थानकात दाखल केली आहे.
कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबकेतील मालमत्तेचा लिलाव झाला आहे. ही जागा दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे वकील भुपेंद्रकुमार भारद्वाज यांनी खरेदी केली होती. मालमत्ता हस्तांतरणाच्या प्रकियेनंतर त्यांनी त्या जागेत होमहवन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 23 ते 24 फेब्रुवारी दरम्यान त्यांच्या जागेत असणाऱ्या घराच्या समोरील शेतात होमहवनाचा कार्यक्रम केला. होमहवन पूर्ण झाल्याशिवाय ते उचलू शकत नसल्याने तेथेच उघड्यावर साहित्य ठेवून ते दापोली कृषी विद्यापीठाच्या किसान भवन येथे राहण्यास गेले.
24 रोजी ते परत तेथे आले असता होमहवनाचे साहित्य चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. यामध्ये पितळी धातूची समई, चारचाकी गाडी, बॅटरी, स्टिलची ताटे, दोन लोखंड हवनपुंड असा 9400 रूपयांचा ऐवज लंपास केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यांच्या मालकीच्या जागेत अनधिकृत घुसून साहित्य चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडमध्ये कुख्यात डॉन दाऊदच्या घरासमोर होमहवनसाठी ठेवलेल्या साहित्याची चोरी
