दापोली:-दापोली तालुक्यामधील धानकोली वेळवी येथून बेपत्ता झालेला प्रौढ आश्चर्यकारकरित्या सापडला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सिद्धार्थ मर्चंडे हा 44 वर्षीय तरूण बेपत्ता झाल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 च्या सुमारास घडली होती.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हा धानकोली येथे राहायला होता. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी घरात कोणालाही काहीही न सांगता तो निघून गेला. सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही म्हणून आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेण्यात आला. तो कोठेही आढळून न आल्यामुळे त्याचा भाऊ संतोष मर्चंडे याने दापोली पोलिसात सिद्धार्थ बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. बेपत्ता झाल्यानंतर तब्बल 36 दिवसांनी 23 मार्च रोजी तो गावातील नदीपात्रात आढळला. सिद्धार्थ हा मानसिक रुग्ण असल्यामुळे तो जंगलामध्येच भटकत राहिलेला असण्याची शक्यता व्यक्त केली.
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सिद्धार्थ जंगलातील काजू करवंद खाऊन राहिला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. सिद्धार्थ नदीपात्रात पडलेला आढळून आला. महिनाभर पोटभर अन्न न मिळाल्यामुळे त्याची प्रकृती अतिशय खालावली होती. त्याला तत्काळ उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार करून प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्याला मुंबई येथे हलविण्याचा सल्ला दापोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून देण्यात आला. त्यानुसार अधिक उपचारार्थ मुंबई येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस फौजदार मोरे करीत आहेत.