रत्नागिरी:- येथील खल्वायन संस्थेची २९९ वी मासिक संगीत सभा सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात उत्साहात पार पडली. अरुअप्पा जोशी स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजर्या झालेल्या या मैफलीमध्ये रत्नागिरीची युवा गायिका कु.वैष्णवी धुंडिराज जोशी हिच्या शास्त्रीय तसेच अभंग नाट्यगीत गायनाने सभा रंगतदार झाली.
वरद जोशी यांच्या हस्ते नटराज पूजन, दीप प्रज्वलन झाले. प्रदीप तेंडुलकर यांनी प्रास्ताविकात कलाकारांची ओळख करून दिली. संस्थाध्यक्ष मनोहर जोशी यांनी कलाकारांना सन्मानपत्र, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
कथ्थक विशारद, संगीत अलंकार व सध्या संगीतामध्ये डॉक्टरेट करीत असलेलल्या वैष्णवी जोशीने भारदस्त स्वरांनी मैफलीची सुरुवात केली. सुरवातीला राग शुद्धसारंगमधील बंदिश सादर झाल्यानंतर तिने सुजन कसा मन चोरी, लेऊ कशी वल्कला, नाम गाऊ, रंगुनी रंगात साऱ्या ही नाट्य, अभंग भावगीते सादर केली. शेवटी स्वामी कृपा कधी करणार या अभंगाने मैफलीचा शेवट केला. स्वच्छ स्वरलगाव, रागाची योग्य मांडणी आणि सादरीकरणातील आत्मविश्वास यामुळे त्यांची मैफल बहारदार झाली.
कार्यक्रमाला सहजसुंदर समर्पक हार्मोनियम आणि तबला साथ रत्नागिरीतील प्रसिद्ध कलाकार चैतन्य पटवर्धन आणि देवरूखचा उदयोन्मुख युवा कलाकार अथर्व आठल्ये यांनी करून कार्यक्रमात त्यांनी रंगत आणली.