मुंबईः राज्यातील १७ हजार ३०० पदांसाठी होणाऱ्या पोलीस भरतीतील पोलीस शिपाई संवर्गातील अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख वाढवण्यात आली असून आता सर्व उमेदवार १५ एप्रिलपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
मराठा समाजाचे एसईबीसीचे प्रमाणपत्र, वयोमर्यादा याबाबत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अर्ज करण्याची मुदत वाढवण्याबाबत अनेक विद्यार्थ्यांकडून विनंती करण्यात आली होती.
राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरु आहे. त्याप्रमाणे उमेदवारांना एसईबीसी प्रमाणपत्र मिळणेस विलंब लागत आहे म्हणून मुंबई पोलीस भरती-२०२३ शिपाई संवर्गातील पदांसाठी सर्व उमेदवारांना अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ मार्च करण्यात आल्याची माहिती अपर महासंचालक(प्रशिक्षण व खास प्रथके) राजकुमार व्हटकर यांनी सांगितले.
राज्य शासनाने पोलीस भरती संदर्भात मार्च २०२३ च्या वयवाढी संदर्भात काढलेल्या आदेशाची वैधता मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात यावी. तसेच एसइबीसी जात प्रमाणपत्र शासन दरबारी मिळण्यास अडचणी येत असल्याने महाराष्ट्र शासनाने जारी केलेली पोलीस भरती प्रक्रिया एमपीएस्सी परीक्षे प्रमाणे पुढे ढकलण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. मराठा समाजातील काही मुलांनी वयोमर्यादा ओलांडली, तर काही मुलांना कागदपत्रे काढण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याने विलंब होत असल्याच्या उमेदवारांच्या तक्रारी होत्या.
याशिवाय अंतिम दिनांकापुर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास, अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेला अर्जाची पोचपावर्तीसह आवेदन अर्ज करता येईल. मात्र पडताळणीवेळी सर्व कागदपत्रे आवश्यक असतील. राज्याभरात १७ हजार ३०० पदांसाठी, तर मुंबईत पोलीस शिपाई पदासाठी २५७२ जागा, चालक पदासाठी ९१७ जागांसाठी भरती होत आहे.