रत्नागिरी:-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेच्या वतीने जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दोन ज्येष्ठ रंगाकर्मीना त्यांच्या रत्नागिरीच्या रंगविश्वासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सन्मान करण्यात येणार आहे. त्यापैकी पाहिले सत्कारमूर्ती आहेत.
ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वामनराव साळवी
श्री साळवी यांचा जन्म – 02 जानेवारी, 1951 रोजी झाला. त्यांचे बालपण व शालेय शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरी येथेच झाले.
प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथील प्रॅक्टिसिंग स्कूल तर माध्यमिक शिक्षण फाटक प्रशाला व पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून पूर्ण केले.
त्यानंतर त्यांनी एसटी महामंडळामध्ये रत्नागिरी विभागीय कार्यालयामध्ये नोकरी केली. ते 31जानेवारी, 2009 पर्यंत कार्यरत होते. आता ते सेवानिवृत्तीनंतरचे जीवन जगत आहेत.
आपली अभिनयाची असलेली आवड त्यांनी 08 एप्रिल, 1976 रोजी श्रीराम नाट्य मंडळ, रत्नागिरी या संस्थेच्या “कुलवंताची मुलगी ” या नाटकामधून आपला अभिनय प्रथम रंगभूमीवर सादर करून केली.
गेली 48 – वर्षे ते रंगभूमीची हौशी कलाकार म्हणून सेवा करत आहेत.
श्रीराम नाट्य मंडळ, अलंकार थिएटर्स, राधाकृष्ण नाट्यमंडळ, बसणी पंचक्रोशी ग्रंथालय, रत्नवेध कलामंच, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रत्नागिरी, समर्थ रंगभूमी, शांभवी प्रॉडक्शन, या रत्नागिरीतील नामवंत नाट्यसंस्थांच्या नाटकांमध्ये अभिनय सादर केला आहे. आता समर्थ रंगभूमी या रत्नागिरी येथील नाट्यसंस्थेत कार्यरत आहेत.
सध्या ते शांभवी प्रॉडक्शन, रत्नागिरीच्या ” आली ती बेस्ट ” या नाटकात अभिनय करत असून आतापर्यंत 25 प्रयोग झाले आहेत.
अनेक जिल्हा, राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. काही स्पर्धांमध्ये त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. अभिनय कलेसोबतच दिग्दर्शन व नेपथ्याचे कामही सुहास करतात.
रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या श्रुतिका व नभोनाट्यांमध्येही त्यांचा कलाकार म्हणून गेली 28 वर्षे सहभाग राहिला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या 62 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी
नाट्य स्पर्धा 2023 – 24 रत्नागिरी केंद्रातून “राधाकृष्ण कलामंच, रत्नागिरी ” निर्मित “That night ” हे नाटक द्वितीय आणि अंतिम फेरीसाठी निवड झालेले नाटक आहे, यानाटकामध्ये कलाकार म्हणून सुहास यांचा सहभाग आहे.
नाटकांतील अभिनयाबरोबरच शिवांश प्रॉडक्शन, मुंबई निर्मित “हातभेटीची ओटी ” या शॉर्टफिल्म मध्ये कलाकार म्हणून त्यांचा सहभाग आहे.
आतापर्यंत सुहास यांना अभिनयासाठी 15 पारितोषिके ज्यामध्ये 02 रौप्यपदके आहेत, दिग्दर्शनासाठी 07 तर नेपथ्यासाठी 02 पारितोषिके मिळाली आहेत.
सुहास यांना मिळालेली काही पारितोषिके –
■ 2001-02 एसटी महामंडळाच्या राज्य नाट्य स्पर्धेत सारे पर्याय खुले हे नाटक राज्यात द्वितीय – या नाटकासाठी अभिनय, दिग्दर्शन व नेपथ्यासाठी द्वितीय पारितोषिक.
■ 2005-06 एसटी महामंडळाच्या राज्य नाट्य स्पर्धेत किरवंत नाटक राज्यात प्रथम – या नाटकातील अभिनयासाठी पारितोषिक.
■ 2007-08 एसटी महामंडळाच्या राज्य नाट्य स्पर्धेत विठू माझा लेकुरवाळा नाटक राज्यात प्रथम या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी प्रथम तसेच अभिनयासाठी पारितोषिक प्राप्त. झालेले आहे. अतिशय मनमिळाऊ आणि आनंदी व्यक्तित्व असणारे सुहासजी कायम सहकालाकारांचे लाडके बनतात.दिग्दर्शक देखील कायम त्यांच्या शांत आणि याच गुणग्राहकतेचे भक्त होतात आणि साळवी सर वरून अगदीच अनायसे साळवी काका होऊन जातात आणि त्या कलाकृतीला देखील आपलंसं करतात.
श्री सुहासजी साळवी यांनी आजपर्यंत केलेले रंगसेवेला कृतज्ञतापूर्वक सलाम करत रत्नागिरीच्या रसिक आणि रंगवर्तुळाच्या वतीने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी प्रेमादारपूर्वक सन्मानित करीत आहे.
दुसरे सत्कारमूर्ती – ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक, मार्गदर्शक ,निवृत्त अधिकारी श्रीकांत गोविंद पाटील यांचा जन्म – 04 जुलै, 1956 रत्नागिरीजवळील बसणी या गावी 04 जुलै,1956 रोजी झाला. प्राथमिक शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत त्यानंतर शालेय शिक्षण जी. एम. शेट्ये हायस्कूल,बसणी येथून पूर्ण केले.महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातून घेतले असून मुंबई विद्यापीठाची बी.ए.पदवी प्राप्त केली आहे. लहानपणीचा काळ खूप कठीण गेला.छोटी – मोठी कामे करून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती.इ.चौथीमध्ये असताना नाटिकेमध्ये अभिनय सादर करून सुरूवात केली ती आजतागायत.गजानन साॅ मिल,बसणी,रत्ना सी फूडस, कर्ला , जे. के.फाईल्स,रत्नागिरी,भूविकास बँक,रत्नागिरी आणि त्यानंतर सहायक कामगार आयुक्त कार्यालय रत्नागिरी.अशा विविध ठिकाणी नोकऱ्या करून सर सन 2013 मध्ये सरकारी नियमानुसार नियमीत वयोमानानुसार निवृत्त झाले आहेत.सर गेली 50-वर्षे रंगभूमीची सेवा करत आहेत. श्रीकांत यांनी आत्तापर्यंत अनेक एकांकिका -नाटक -आकाशवाणीवरील कार्यक्रमात सहभाग नोंदविला आहे. काटेरी कुंपण,जगी ज्यास कोणी नाही, परंपरा, पाऊलवाट, वैधव्याची कुऱ्हाड, उद्ध्वस्त संसार ही नभोनाट्य पुनःप्रसारित झाली आहेत.अभिनयासोबतच दिग्दर्शन, प्रकाश योजना व लेखनही ते करतात. श्रीकांत यांनी नाट्य क्षेत्रात केलेल्या कामाविषयी –
27 एकांकिका 62 नाटकांमधून अभिनय
45 नाटकांचे दिग्दर्शन 23 एकांकिकांचे दिग्दर्शन
40 लोकनाट्य,नभोनाट्य,कथा,भाषणे आदि आकाशवाणी, रत्नागिरी केंद्राच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग.
इंद्रमंजिल,क्षितीज,प्रल ही पुस्तके तयार करण्यात महत्वाचा सहभाग.
श्रीकांत यांनी नाट्यविषयाशी निगडीत अनेक विषयांवर विपुल लेखन केले आहे व करत आहेत. लेखन – दिग्दर्शन – प्रकाश योजना – अभिनय यांसाठी महाराष्ट्रातील अनेक स्पर्धांमधून सहभाग घेतला असून त्यामध्ये सुमारे 100 पारितोषिके प्राप्त केली आहेत .सर सन 1979 साली राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम सहभागी झाले ते आजपर्यंत. समर्थ रंगभूमी, या रत्नागिरीतील संस्थेच्या माध्यमातून राज्य नाट्यस्पर्धेत अनेक नाटके एकांकिकांमध्ये सहभाग नोंदविला आहे. आत्तापर्यंत अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी मार्गदर्शन केले असून अनेक कलाकार पारितोषिक प्राप्त केली आहेत.
सरांच्या कामाची पोचपावती म्हणून सन 2016 मध्ये तत्कालिन पालकमंत्री ना. रविंद्र वायकर यांच्या हस्ते सरांना “रत्नागिरी भूषण” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्रीकांत यांनी केलेले विविध लेखन –
एकांकिका-
काटेरी कुंपण परंपरा रामराज्य येतय
जगी ज्यास कोणी नाही जीवनयात्रा
वैधव्याची कुर्हाड विश्वासघात
वणवा मोराचे पाय पाऊलवाट
कथा – उद्ध्वस्त संसार वैधव्य
नाटक – किनारा तुला पामराला ( अप्रकाशित)
लेख – शब्दप्रभू गडकरी
दै. तरूण भारतमध्ये तिसरी घंटा लेख प्रसिद्ध
ह्याव्यतिरिक्त श्रीकांत यांनी परीक्षक म्हणूनही काम पहातात. जिल्हास्तरीय ॰ बालनाट्य ॰ मोनो अँन्करिंग ॰ एकपात्री अभिनय ॰ जलसा ॰ नाट्य ॰ एकांकिका ॰ पुरूषोत्तम करंडक, पुणे आयोजित एकांकिका ॰ रेकॉर्ड डान्स आदि स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.
आजपर्यंत जवळपास 26 संस्थांनी त्यांचा सत्कार केला आहे.
सर सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतात. ते जवळपास 19 सामाजिक संस्थांमध्ये अध्यक्ष, सचिव, खजिनदार अशा महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. सरानी
अनेक राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग नोंदविला असून महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक व अंतिम नाट्य स्पर्धेत 9 रौप्यपदक मिळवली आहेत. बक्षिसांचा तपशील –
□ 1981 काही स्वप्न विकायचीत प्रादेशिक भूमिका- वाडीवरचा मास्तर
□ 1986 धुम्मस प्रादेशिक (12 जिल्ह्यातप्रथम) भूमिका – प्रताप
□ 1991 गाठ आहे माझ्याशी प्रादेशिक भूमिका – विश्वजीत
□ 1992 रावसाहेब प्रादेशिक प्रमाणपत्र भूमिका- रावसाहेब
□ 1993 अग्निहोत्र प्रादेशिक भूमिका – कुमार
□ 1998 सामना अंतिम भूमिका – बाप्पाजी
□ 1999 सैनिक नावाचा माणूस प्रादेशिक भूमिका – बहादूरसिंग
□ 2000 सैनिक नावाचा माणूस अंतिम भूमिका – बहादूरसिंग
□ 2006 विठू माझा लेकुरवाळा प्रादेशिक भूमिका – विठू
□ 2008 कुंतिपार्थवा अंतिम भूमिका – विदुर
या दैदिप्यमान रंगकारकीर्दीबद्दल आणि अविरत नाट्य संस्कार रत्नागिरीकर युवक युवतींवर करणाऱ्या श्री पाटील सर यांचा सन्मान करताना अकगील भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने सरांच्या बाबत ऋणनिर्देश व्यक्त करीत आहोत.
माहिती संकलन दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.