गुहागर:-परचुरी येथे वाशिष्ठी नदीला साडी नेसवून जागतिक जलदिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
गुहागर तालुक्यातील परचुरीमध्ये पर्यटन व्यावसायिक सत्यवान देर्देकर, डॉ. समिधा देर्देकर, समर्थ देर्देकर यांच्या संकल्पनेतून वाशिष्ठी नदीला साडी नेसवण्याचा कार्यक्रम झाला. यानिमित्ताने १८ ते २१ मार्च असे चार दिवस हाऊस बोटीत भागवत पुराण आणि मत्स्यपुराणाचे पारायण करण्यात आले. जागतिक जल दिन २२ मार्च रोजी साजरा केला जात असल्याने सकाळी नदीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर साडी नेसविण्याचा कार्यक्रम पार पडला.
परचुरी गावात वाशिष्ठी नदीचे पात्र २९० मीटर रुंद आहे. एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत साडी नेसवण्यासाठी ६५ साड्या लागल्या. या साड्या एकमेकांना बांधून लांब पट्टा तयार करण्यात आला. एका किनाऱ्यावरून हा पट्टा एका बोटीदवारे दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत नेण्यात आला. नदीच्या मध्यभागी काही क्षण थांबून नदीची खणानारळाने ओटी भरण्यात आली.
यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोकण अभ्यासक पत्रकार धीरज वाटेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी यावेळी सांगितले की, वाशिष्ठी नदीचा उगमापासून संगमापर्यंतचा प्रवास जैवविविधतेने नटलेला आहे. या जादूई प्रदेशाचे संवर्धन करण्यासाठी जल्रपर्यटन, जलमार्गाने वाहतूक असे वेगवेगळे विषय जोडले पाहिजेत. त्यातून या नदीच्या तीरांवरील गावे समृद्ध करता येतील. वाशिष्ठी नदीच्या तीरावर अठरापगड जातींची संस्कृती विकसित झाली आहे. दाभोळ बंदरातून विदेशामध्ये अनेक प्रकारचा माल निर्यात केला जायचा. या नदीचा उगमापासून संगमापर्यंतचा प्रवास जैवविविधतेने नटलेला आहे. या जादूई प्रदेशाचे संवर्धन आपल्याला करावे लागेल. कोकणाला समृद्ध आणि संपन्न करणारी ही संस्कृती पुन्हा प्रस्थापित करावी लागेल. जलपर्यटन, जलमार्गाने वाहतूक यातून वाशिष्ठीचे वैभव आपण परत आणू शकतो. त्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वाशिष्ठीला साडी नेसवण्याच्या कार्यक्रमाकडे पाहिले पाहिजे.
वाशिष्ठी नदीची माहिती सांगताना श्री. वाटेकर म्हणाले की, जागतिक जलदिनाची संकल्पना चिपळूणचे मूळ रहिवासी माधवराव चितळे यांनी संयुक्त राष्ट्र संघात प्रथम मांडली होती. डच लोकांनी १६३७ मध्ये आणि स्वातंत्र्यानंतर १९७१ मध्ये गोरे नावाच्या अधिकाऱ्यांनीही वाशिष्ठीचा अभ्यास केला होता. या अभ्यासातून येथे देशातील मोठे बंदर विकसित करता येईल, असा निष्कर्ष निघाला होता. खासदार (कै.) बापूसाहेब परुळेकर यांनी वाशिष्ठी नदीच्या विकासाचा मुद्दा लोकसभेत मांडला होता. वाशिष्ठीच्या नदीपात्रात, समुद्राला जवळ असलेले दाभोळ हे भारताच्या इतिहासातील शक्तिशाली बंदर म्हणून ओळखले जायचे. या बंदराचा विस्तार, उद्योगांची जोड असे वेगवेगळे मुद्दे चर्चेत आले. परंतु त्यानंतर दिघी बंदराचा विकास झाला.
श्री. वाटेकर म्हणले, भारतातील बहुतांश नद्या आज प्रदूषित झाल्या आहेत. म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. करोना काळातील लॉकडाऊनमध्ये वाशिष्ठी नदीला मोकळा श्वास घ्यायची संधी मिळाली. त्यानंतर आजपर्यंत न दिसणारे अनेक जलचर याच वाशिष्ठीत दिसून आले. पाण्याची गुणवत्ता सुधारली. नदीचे सौंदर्य पाहता आले. नदीचे हे सौंदर्य अबाधित ठेवायचे असेल, तर नदीपात्र स्वच्छ राहील, गाळाने भरणार नाही यासाठी आपल्याला नदीबरोबरचे नाते अधिक घट्ट करावे लागेल. कोकणात प्रथमच त्याची सुरवात या कार्यक्रमाने झाली आहे.
माहितीपूर्ण विवेचनानंतर धीरज वाटेकर यांनी उपस्थितांना नद्या स्वच्छ, प्रदूषणमुकत करण्यासाठी योगदान देण्याची शपथ दिली. वाशिष्ठी नदीला साडी नेसवण्याच्या कार्यक्रमानंतर नदीला नेसवलेल्या साड्या प्रसाद म्हणून उपस्थित महिलांना देण्यात आल्या. कार्यक्रमाला गुहागर तालुक्याबरोबरच कराड, नाशिक, पुणे येथून पर्यटक उपस्थित होते.