रत्नागिरी:-जगद्गुरू शंकराचार्य यांच्या विचारांवर आधारित एकदिवसाचे चर्चासत्राचे येत्या शुक्रवारी, दि. २९ मार्च रोजी रत्नागिरीत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रात सकाळी १० वाजता होणार आहे.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा संस्कृत विभाग यांच्या सहयोगाने, भारतीय भाषा समितीच्या आर्थिक साहाय्याने हे निःशुल्क चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. केवळ नावनोंदणी करणे आवश्यक आहे. चर्चासत्राच्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वांसाठी उपाहार, मध्यान्ह भोजनाची आणि चहापानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय चर्चासत्रात सहभागी व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी कश्मिरा दळी (9028494199) आणि अविनाश चव्हाण (83908 54926) यांच्याशी संपर्क साधावा.
जगद्गुरू श्री शंकराचार्य हे सनातन संस्कृती आणि संपूर्ण भारतवर्षासाठी पूज्य आहेत. भारताची भौगोलिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील एकता आणि अखंडता कायमस्वरूपी दृढ करण्याकरिता जगद्गुरू श्री शंकराचार्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. भारताच्या एकात्मतेसाठी शंकराचार्यांचे योगदान अमूल्य आहे. या सगळ्या गोष्टींवर या चर्चासत्राच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे. रत्नागिरीकरांनी या चर्चासत्रात सहभागी होऊन शंकराचार्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या योगदानाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी उपकेंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.