संगमेश्वर:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठले-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील कु. स्नेहा नितीन शेट्ये (११वी वाणिज्य) हिला राष्ट्रीय सेवा योजना (+२स्तर) कोल्हापूर विभागातून उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे. कु. स्नेहा शेट्ये हिला मिळालेल्या पुरस्कारासाठी महाविद्यालयात कौतुक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये २ वर्ष उत्तम काम करणाऱ्या ५० स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सन्मानित केले. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. अभिनय पातेरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. मयूरेश राणे यांनी केले. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्कार प्राप्त कुमारी स्नेहा शेट्ये हिचा येथोचीत सत्कार केला. यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये दोन वर्ष उत्तम कार्य करणाऱ्या ५० स्वयंसेवकांना प्राचार्य व उपप्राचार्य सरांनी सन्मानित केले.
प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी विद्यार्थी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजनेव्दारे स्वयंसेवकांनी केलेली कामे समाजासाठी उपयुक्त व आदर्शवत असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक बदलाबाबतची सविस्तर माहिती नमूद केली. राष्ट्रीय सेवा योजनेतून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळणारे पुरस्कार हे उत्कृष्ट कामाचे द्योतक असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थ्यांसह प्रा. स्वप्नाली झेपले आणि प्रा. धनंजय दळवी उपस्थित होते. स्नेहा शेट्ये हिला उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.