संगमेश्वर:-कोकणातील धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्याच्या ढोल्यांचे संरक्षण आणि नोंदणी, अधिवासाचे पुनरुज्जीवन, खाद्यफळांच्या वृक्षांची लागवड, खाजगी जागेतील धनेश पक्ष्यांच्या ढोल्यांचे संवर्धन आणि जनजागृती या पातळ्यांवर काम करणे आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार देवरूखमध्ये पार पडलेल्या ‘धनेशमित्र संमेलना’त करण्यात आला.
कोकणात पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेले धनेशमित्र निसर्ग मंडळ आणि देवरूखमधील सह्याद्री संकल्प सोसायटीच्या संकल्पनेतून हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. देवरूखमधील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील एस. के. पाटील सभागृहात दिवसभर महाराष्ट्रातील पहिले धनेशमित्र संमेलन पार पडले. या संमेलनाला नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशन आणि गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि एन व्ही इको फार्म यांनी अर्थसाहाय्य केले.
संमेलनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी व्यासपीठावर देवरूख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत, ज्येष्ठ वन्यजीव संशोधक भाऊ काटदरे, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, रत्नागिरीचे मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट, नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशनचे वन्यजीव संशोधक डॉ. रोहित नानिवडेकर आणि वनस्पती अभ्यासक डॉ. अमित मिरगल उपस्थित होते.
कोकणात ककणेर म्हणून ओळख असलेल्या या पक्ष्याच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहे. कोकणात केली जाणारी निसर्गाची पूजा हीच वन्यजीव संवर्धनाचा पाया आहे, असे प्रास्ताविकात सदानंद भागवत यांनी सांगितले. सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे यांनी संमेलनाच्या पहिल्या सत्रात कोकणातील धनेश पक्ष्यांच्या नोंदीविषयी माहिती दिली. सीसीटीव्ही कॅमेरा लावून देवरूखमध्ये धनेश पक्ष्यांच्या प्रजननक्रिया कशा पद्धतीने नोंदवल्या जात आहेत, याविषयी त्यांनी माहिती दिली.
डॉ. रोहित नानिवडेकर यांनी खुल्या चर्चासत्रामधून स्थानिकांना कोकणात धनेश पक्ष्यांच्या संवर्धनामध्ये असलेल्या आव्हानांविषयी बोलते केले. यावेळी स्थानिकांनी धनेशाला असलेल्या धोक्यांची यादी तयार केली. हवामान बदलामुळे घरट्यांवर होणारा प्रभाव तपासण्यासाठी वर्षानुवर्षांच्या नोंदी आणि मोठ्या संख्येने धनेशाच्या घरट्यांचे निरीक्षण नोंदवणे आवश्यक आहे. हे निरीक्षण सिटीझन सायन्स प्रोग्रामअंतर्गत करता येऊ शकते, असे मत नानिवडेकर यांनी सत्राअंती मांडले. या सत्रानंतर महाएमटीबी आणि द हॅबिटॅट्स ट्रस्ट निर्मित महाधनेश पक्ष्यावरील माहितीपटाचे सादरीकरण झाले.
पर्यावरण प्रतिनिधी अक्षय मांडवकर उपस्थितांशी संवाद साधला. धनेश पक्ष्यांना असणाऱ्या धोक्यांवर मात करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत, यावर खुले चर्चासत्र पार पडले. कमी वेगाने वाढणाऱ्या झाडांचे ‘इन-सिटू’ पद्धतीने संवर्धन करून, वेगाने वाढणाऱ्या प्रजाती या धनेशाच्या अधिवास संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये वापरणे आवश्यक असल्याचे मत वनस्पती अभ्यासक डॉ. अमित मिरगल यांनी मांडले.
धनेश पक्ष्यांच्या अधिवासाच्या पुनरुज्जीवनाविषयी नानिवडेकर यांनी प्रमुख मुद्दे मांडले. स्थानिक झाडांच्या रोपांची उपलब्धता हा धनेशाच्या संवर्धनाच्या कामात येणारा सर्वांत मोठा अडथळा आहे. मोठ्या संख्येने स्थानिक झाडांची रोपे तयार करणाऱ्या रोपवाटिकांना प्रोत्साहन देणे हे धनेशाच्या अधिवास संवर्धनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे प्रतिपादन नानिवडेकर यांनी केले. त्यानंतर त्यांनी धनेशाचे छायाचित्र काढताना कोणती तत्त्वे पाळावीत, याविषयी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.
सत्रादरम्यान धनेश पक्ष्यांविषयी वेगवेगळे खेळ पार पडले. धनेश संवर्धनाविषयी या संमेलनामधून नोंदवलेले प्रमुख मुद्दे हे सरकार दरबारी मांडण्यात येणार आहेत. सृष्टीज्ञान संस्था, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ, चिपळूणमधील सह्याद्री निसर्ग मित्र, एन व्ही इको फार्म (गोवा), महाराष्ट्र वन विभाग आणि निसर्ग सोबती (रत्नागिरी) यांच्या सहकार्याने हे संमेलन पार पडले.
कोकणात धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा संमेलनामध्ये धनेशमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. देवळे गावातील धनेशमित्र भरत चव्हाण, डॉ. शार्दूल केळकर, डॉ. अमित मिरगल, राजापूरचे धनेशमित्र धनंजय मराठे, निसर्गाची राजदूत तनुजा माईण आणि पर्यावरण पत्रकार अक्षय मांडवकर यांचा त्यात समावेश होता. कोसुंब, आंगवली, देवळे, देवडे, किरबेट, धामणी या ग्रामपंचायतींनीदेखील धनेशाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचादेखील सन्मान करण्यात आला.
धनेश पक्षाच्या संवर्धनासाठी देवरुखात प्रयत्न करण्याचा निर्धार
