नवी दिल्ली:-भूतानमध्ये थिम्पू येथील तेंद्रेलथांग येथे एका सार्वजनिक समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानच्या राजांच्या हस्ते ऑर्डर ऑफ ड्रुक ग्याल्पो प्रदान करण्यात आला.
भूतानचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पहिल्यांदाच हा प्रतिष्ठेचा पुरस्कार एका परदेशी नेत्याला मिळाला आहे.
डिसेंबर 2021मध्ये थिम्पूत ताशीछोडझोंग येथे झालेल्या भूतानच्या 114 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात भूतानचे राजे यांनी हा पुरस्कार जाहीर केला होता . भारत-भूतान मैत्री मजबूत करण्यासाठी मोदी यांनी दिलेले योगदान तसेच त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची दखल घेत मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महासत्ता म्हणून भारताचा उदय झाला असून त्यांच्या कार्यकाळातच भारताचा भूतानशी विशेष बंध तयार झाल्याने हा पुरस्कार देऊन मोदी यांचा गौरव करण्यात आला. मोदींच्या नेतृत्वाने भारताला परिवर्तनाच्या मार्गावर आणले आहे, त्यांच्यामुळे भारताचे जागतिक पातळीवर नैतिक अधिपत्य आणि प्रभाव वाढला आहे असे प्रशस्तीपत्रात नमूद केले आहे.
हा पुरस्कार 1.4 अब्ज भारतीयांचाच सन्मान असून दोन्ही देशांमधील विशेष आणि अनोख्या संबंधांचे हे द्योतक असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. मानांकन आणि प्राधान्यानुसार, ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो हा सन्मान भूतानमधे जीवनगौरव म्हणून सुरू करण्यात आला आहे.भूतानमधील हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे जो सर्व सन्मान आणि पदकांमध्ये सर्वोच्च आहे.