रत्नागिरी:-जिल्हा शासकीय रुग्णालय आणि जिल्हाधिकारी यांच्या तत्परतेमुळे चिपळूण येथील मजुराच्या नवजात शिशूला अंधत्व येण्यापासून वाचविण्यात विशेष नवजात केअर युनिटाला यश आले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात विशेष नवजात केअर युनिट आहे. या युनिटमध्ये चिपळूण येथे रोजंदारीवर करणाऱ्या मूळची उत्तर प्रदेशातील महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. तिचे १२०० ग्रॅम वजनाचे बाळ ९ फेब्रुवारी रोजी उपचारांसाठी ठेवण्यात आले होते. प्रसूतीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी रुणालय प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता ती महिला निघून गेली. या बालकाच्या पालकांची मजुरी बुडू नये, यासाठी तिने हे पाऊल उचलले होते. मात्र या महिलेल्या नवजात बालकाला डोळ्यांचा गंभीर आजार होता. त्यामुळे त्यावर उपचार करणे जरुरीचे होते. मात्र तत्पूर्वीच ती महिला रोजगार बुडेल, या भीतीने निघून गेली.
ही बाब लक्षात येताच जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळविले. ही बाब गंभीर असल्याने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी चिपळूण येथे त्या बालकाचे आई-वडील जेथे काम करतात, तेथील कंत्राटदाराशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. बालकाच्या मातेला तत्काळ पुन्हा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यास सांगितले. तसेच जोपर्यंत बाळ उपचार घेत आहे, तोपर्यंतची तिची मजुरी अदा करण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्यामुळे मुलाच्या बुब्बुळाच्या आजारावर तत्काळ उपचार होऊ शकले.
रत्नागिरी प्रशासनाच्या तत्परतेमुळे नवजात शिशूचे अंधत्व वाचविण्यात यश
