रत्नागिरी:-पुढील वर्षीच्या हाफ मॅरेथॉनसाठी रन फॉर बायोडायव्हर्सिटी ही संकल्पना घेतली असून या संकल्पेनेचे संगणकीय कळ दाबून उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांन केले.
यंदा नववर्षाच्या पहिल्या रविवारी सुवर्णसूर्य फाउंडेशनने पहिली कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन घेतली. मॅरेथॉनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोकणवासीयांनी, कोकणवासीयांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली मॅरेथॉन अशी या मॅरेथॉनची ओळख झाली. सहभागी धावपटूंनी एकमुखाने आजपर्यंत कोकणात झालेली सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन अशी पोचपावती या मॅरेथॉनला दिली. मॅरेथॉन क्षेत्रात नावाजल्या गेलेल्या मुंबई रोड रनरच्या रेटिंगमध्येसुद्धा ही मॅरेथॉन टॉप ३ मध्ये पोहोचली. पहिली मॅरेथॉन झाल्या झाल्या जास्तीतजास्त धावपटूंनी दुसऱ्या पर्वात सहभागी होण्यासाठी सुरवात केली आहे. त्या सर्वांना या मॅरेथॉनच्या थीमची प्रतीक्षा होती.
येथील सी फॅन्स हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात पुढच्या वर्षीची रन फॉर बायोडायव्हर्सिटी ही संकल्पना मांडण्यात आली आणि त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले. याप्रसंगी धनंजय कुलकर्णी म्हणाले की, मी अनेक ठिकाणच्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. यंदा हाफ मॅरेथॉनचे पहिले वर्ष आणि रत्नागिरी छोटे शहर असताना खूप मेहनत घेतल्याचे दिसले. आधीच्या ७ महिन्यांपासून आयोजक तयारी करत होते. हे एक अवघड काम होते. परंतु ते टीमवर्कमुळे लीलया पार झाले. पुढच्या वर्षीची रन फॉर बायोडायव्हर्सिटी ही संकल्पना खूप चांगली आहे. कोकणचा निसर्ग सर्वांनाच भुरळ घालतो. कोकणला निसर्गाने भरभरून दिले आहे. त्याचे संवर्धन, जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. समुद्रकिनारे, कांदळवन, पक्षी, सह्याद्री रांगा आदींचे संवर्धन महत्त्वाचे आहे. लोकांच्या मनात गैरसमज असतात. ते दूर केले पाहिजेत. भाजावळ केल्यामुळे पीक चांगले येते, असा गैरसमज आहे. परंतु तेथील गवत जळाल्याने पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी यांचे नुकसान होते. बिया जळून जातात. यानिमित्ताने हे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यासाटी प्रयत्न करू या. जिल्हा पोलीस आणि प्रशासन यामध्ये सहभागी होईल. आगी लागून आंबा, काजूच्या बागा जळतात, लोकांचा मृत्यू होतो. ते टाळण्यासाठी जैवविविधता संवर्धनासंबंधी अनेक उपक्रम करता येतील. प्लास्टिकचा वापर कमी करण्याकरिता कचरा संकलन, गावात कचरा फेकला जाऊ नये, याकरिता प्रयत्न करू या. चिपळूण, रत्नागिरीत प्लास्टिक पुनर्प्रक्रिया प्रकल्प आहेत. या सर्वांसह शासकीय यंत्रणांना एकत्र आणू या. या माध्यमातून चांगली चळवळ उभी राहील. सर्वतोपरी मदत करू या.
सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक संचालक प्रसाद देवस्थळी यांनी या वर्षी ७ जानेवारीला झालेल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचा आढावा घेतला. पहिली मॅरेथॉन रन फॉर एज्युकेशन या संकल्पनेवर झाली. दुसऱ्या पर्वाच्या मॅरेथॉनमध्ये रन फॉर बायोडायव्हर्सिटी या संकल्पनेअंतर्गत संपूर्ण कोकणातील शेतकऱ्यांना आवाहन करणार आहोत. धावनगरी रत्नागिरीमध्ये जेवढे स्पर्धक धावतील तेवढी झाडे आम्ही जगवू. त्यासाठी १०० शेतकरी शोधणार आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते झाडे जगवतील, असेही ते म्हणाले.
कोकण कोस्टल मॅरेथॉनचा लोगो असलेल्या आंबा बॉक्सचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले. मॅरेथॉनमध्ये विशेष सहकार्य करणाऱ्यांचे कौतुक पोलीस अधीक्षकांच्या हस्ते करण्यात आले. यात सौरभ मलुष्टे, गणेश धुरी, सुनील सहस्रबुद्धे, कांचन चांदोरकर, योगेश रजपूत, माधुरी कळंबटे, पराग पानवलकर, अॅड. पराग शिंदे, अभि इंदुलकर यांचा समावेश होता.
रत्नागिरीत पुढील वर्षी रन फॉर बायोडायव्हर्सिटी संकल्पनेवर हाफ मॅरेथॉन
