देवगड:- आतापर्यंत देवगड तालुक्यात शंभरहुन अधिक कातळचित्रे सापडली आहेत. पण देवगडच्या किनारपट्टी भागात व त्याहून देवगडच्या दक्षिणेकडील भागात आतापर्यंत कातळचित्रे सापडली नव्हती.
कोकण इतिहास परिषद व देवगड इतिहास संशोधन मंडळ हे सातत्याने गेली काही वर्षे कातळचित्र शोध मोहीम राबवत आहे. काल दिनांक 15 मार्च रोजी मुणगे या गावातील आडबंदर येथील सड्यावर दोन मानवाकृती सापडल्या आहेत. रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांनी या कातळी चित्रांचा शोध घेतला त्यावेळी येथे पुसटश्या मानवाकृती रेषा दिसत होत्या. या दोन आकृत्यांमध्ये दगड मातीचा मोठा ढीग पडलेला होता. त्यामुळे ह्या चित्रांचे नेमके आकलन काही होत नव्हते. इथली दगड माती उचलून बारकाईने सर्वच साफसफाई केल्यानंतर या कातळचित्रांची आकृती स्पष्टपणे दिसू लागली.
या दोन उलट सुलट साडेपाच फूट उंचीच्या मानवाकृती आहेत. उत्तर-दक्षिण अशी इथे जर मध्य रेषा काढली तर यातील एक आकृती पूर्वेकडे पाय सोडून व दुसरी आकृती पश्चिमेकडे पाय सोडून आहे. दोन्ही आकृत्यांची डोकी जवळ जवळ काढलेली नसावीत असे दिसते. डोक्याच्या जागी फक्त एक एक खळगे कोरलेले दिसते. या कातळचित्राच्या रेषा अतिशय सफाईने काढलेल्या दिसतात. खांदे, हात, कंबर, पायाच्या पोटऱ्या दर्शविणाऱ्या बाह्यरेषा सराईतपणे कोरलेल्या दिसतात. अन्यत्र आढळणाऱ्या मानवाकृती इतक्या सफाईने कोरलेल्या दिसत नाहीत.
देवगड आडबंदर येथे सापडली दोन विशेष कातळचित्रे
