राजापूर:-संगमेश्वर बस डेपोच्या चालकाने मद्यपान करून गाडी चालवल्याची घटना ताजी असताना शनिवारी सकाळी पुण्याहून राजापूरला येणाऱ्या बसचा चालकही मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या बाबत प्रवाशांनी सातारा बसस्थानकात तक्रार केल्याने पुणे-राजापूर बस सातारा स्थानकातच उभी करुन ठेवण्यात आली होती. त्यातच सातारा बसस्थानकाच्या प्रशासनाने पुढील प्रवासासाठी हात झटकल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे एसटी प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राजापूर आगाराची पूणे-राजापूर ही बस शनिवारी सकाळी 9 वाजता पुणे स्थानकातून राजापूरकडे निघाली. मात्र या बसचा चालक दारूच्या नशेत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्याने प्रवाशांनी ही बस सातारा स्थानकात थांबवून त्या बाबत तक्रार केली. मात्र सातारा स्थानकाच्या प्रशासनाने या बाबत हात वर केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यानंतर राजापूरकडे येणा-या एका महिला प्रवाशाने आपल्या राजापूर येथील नातेवाईकांना या बाबत माहिती दिल्याने त्यांनी राजापूर बस डेपोशी संपर्प साधला. मात्र राजापूर बस डेपोच्या प्रशासनानेही उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती राजापूर गुरववाडी येथील नागरिक सचिन गुरव यांनी पत्रकारांना दिली. मद्यपान करून एसटी बस चालवण्याचा आठवडाभरातील जिल्ह्यातील हा दुसरा पकार आहे. अशा घटनांमुळे एसटी विभागाच्या पतिमेला धक्का पोहचत असून अशापकारे मद्यधुंद अवस्थेत बस चालवून प्रवाशांच्या जीविताशी खेळणाऱया चालकांवर एसटी पशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून करण्यात येत आहे.