रत्नागिरी:-लोकसभा निवडण़कीच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांसह मटका, जुगाराचे सुमारे पाच गुन्हे दाखल असलेल्या सरफराज उर्फ बॉक्सर अहमद शहा (35, रा. गवळीवाडा) याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56 (1) (अ) अन्वये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी जीवन देसाई यांनी शनिवारी सायंकाळी हे आदेश काढले.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी जाहिर झाल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. अवैध व्यावसायातून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सरफराज उर्फ बॉक्सर अहमद शहा याच्याविरोधात शहर पोलीस स्थानकात 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस निरिक्षक महेश तोरसकर यांनी उपविभागिय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय दंडाधिकाऱयांकडे पाठवला होता. त्यावर सुनावणी घेवून उपविभागीय दंडाधिकारी जीवन देसाई यांनी शनिवारी सायंकाळी अंतिम आदेश करताना सरफराजला रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे.