मुंबई:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प प्रणालीच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. ते ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमास उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजीटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येणार आहे. यावेळी बीड जिल्ह्यातील २२ शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम जमा करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषि क्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प केला आहे. डिजीटल क्रांतीचा वापर शेतकरी व कृषि क्षेत्राच्या विकासासाठी करायचा आहे. केंद्र सरकारबरोबरच राज्यातील सरकारही शेतकऱ्यासोबत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचे सरकार शेतकरी व सर्वसामान्यांचे हित जपणारे सरकार आहे. सरकारकडून अतिवृष्टी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सर्व योजनांचे नियोजन सरकारकडून केले जाते. महायुतीच्या सरकारने गेल्या दीड वर्षात शेतकऱ्याना ४५ हजार कोटींची मदत केली आहे. सिंचनांचे १२० प्रकल्प मार्गी लावले आहेत. यामुळे राज्यातील १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ
