पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पोहचवण्यासाठी राज्यात प्रयोग – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी- स्वा. वि. दा. सावरकर मैदानात उपस्थित भरगच्च चिपळूणकरांच्या साक्षीने पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आरती करुन महानाट्य ‘जाणता राजा’ चे उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र लोकांपर्यंत विशेषतः पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठीच राज्यभर या महानाट्याचे प्रयोग करण्यात येत आहेत. शनिवारपर्यंत चालणारे हे महानाट्य पहाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा स्तरावर “जाणता राजा” या महानाट्याचे प्रयोग आजपासून 16 मार्च रोजी स्वा. वि. दा. सावरकर मैदान, बहाददूरशेख नाका, चिपळूण येथे सायंकाळी 6 ते 9 या वेळेत आयोजित करण्यात आले आहेत.पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते आज याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार शेखर निकम, सिंधूरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे आदी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील उमरखिंडच्या मावळ्यांचा लढाईचा इतिहास सांगून, पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, २५ कोटीमधून महाराजांचे स्मारक त्यात शिवधनुष्य हाती घेतलेला महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्याजवळील शिवसृष्टीला चिपळूणकरांनी भेट द्यावी. यातून महाराजांचा आभास होतो. महाराज आपल्याशी जे बोलतात ते ऐकावे. पुन्हा एकदा आदर्श महाराष्ट्र उभा रहायला वेळ लागणार नाही.
चिपळूणकरांच्या नळपाणी योजनेसाठी १५० कोटी दिले जातील. शिवसृष्टीचे कामदेखील सुरु असून, भेडसावणारा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी साडेनऊ कोटी मंजूर केले आहेत. लाल आणि निळ्या रेषेबाबत चिपळूणकरांना कोणताही त्रास होईल, असे एकही पाऊल उचलले जाणार नाही. राज्य शासनामार्फत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले.