रत्नागिरी:-‘कांदळवन कक्ष’ आणि ‘कांदळवन प्रतिष्ठाना’कडून रत्नागिरीतील नाचणे आणि पावस गावामध्ये कांदळवन निसर्ग पर्यटनाला सुरुवात करण्यात आली आहे.
मंगळवारी या प्रकल्पाचे लोकापर्ण करण्यात आले यामाध्यमातून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना कांदळवन सफारी, पक्षीनिरीक्षण आणि कयाकिंग करता येणार आहे. वन विभागाच्या ‘कांदळवन संरक्षण व उपजिविका निर्माण योजने’अंतर्गत कोकणातील किनारी भागामध्ये निसर्ग पर्यटन व उपजिवीका निर्मितीचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. यामधील निसर्ग पर्यटन उपक्रमाअंतर्गत पावस आणि नाचणे गावात कांदळवन निसर्ग पर्यटनाला सुरुवात करण्यात आली आहे. या गावांमध्ये कांदळवन सहव्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामार्फत पावसमधील भाटीवाडी येथे ‘गौतमी कांदळवन पर्यटन प्रकल्प’ सुरू करण्यात आला आहे. पावस येथे पर्यटकांना कांदळवन अभ्यास फेरी, कांदळवन नौका सफारी, पक्षी निरीक्षण करता येणार आहे. तर नाचणेमधील नारायण मळी येथील ‘काजळी कांदळवन पर्यटन प्रकल्पा’अंतर्गत कांदळवन सफारीबरोबरच कायकिंग देखील करता येणार आहे. येथील कायकिंग लवकरच सुरू होणार आहे.
या निसर्ग पर्यटनासाठी वन विभागाने पावस गावाला बोट आणि नाचणे गावाला बोटीसह दोन कयाक दिल्या आहेत. कांदळवनावर आधारित निसर्ग पर्यटन करण्यासाठी गावातील ग्रामस्थांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. कांदळवन सफारीचे शुल्क २०० रुपये ठेवण्यात आले आहे. पावस येथील प्रकल्पाला भेट देण्यासाठी सुरेखा पावसकर (8975322086) आणि किरण सारंग (7507961070) यांना संपर्क साधू शकता. नाचणे येथील प्रकल्पाला भेट देण्यासाठी दिपक गझने (9822503358) आणि निलेश गझने (९९७५५५३९३५) यांना संपर्क साधून शकता.