रत्नागिरी:-शासनामार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरती अगदी अंतिम टप्प्यात येऊन फक्त नियुक्ती आदेश देण्याचे काम शिल्लक होते. पण शिक्षक संघटनांनी एकत्र येत प्रथम लांबणीवर पडलेल्या जिल्हांतर्गत बदल्यांची मागणी केल्यामुळे शासनाला संघटनांपुढे नमते धोरण घ्यावे लागले आहे. त्यामुळे प्रथम जिल्हांतर्गत बदल्या कराव्यात, असे एका दिवसात आदेश काढण्यात आल्यामुळे आता शिक्षकांच्या सोयीसाठी नवीन भरती रखडली आहे.
प्रथम जिल्हांतर्गत शिक्षक बदल्या कराव्यात, असे एका दिवसात आदेश काढले. यामुळे आता शिक्षकांच्या सोयीसाठी नवीन भरती रखडली आहे. बुधवारी जिल्हांतर्गत बदल्यांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे जिल्हांतर्गत बदलीचा प्रश्न सोडवल्यानंतरच नवीन उमेदवारांसाठी समूपदेशन घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार बुधवारी शिक्षकांचे समूपदेशन लावण्यात आले होते. जि. प. येथील लोकनेते शामराव पेजे सभागृहात शिक्षकांचे समूपदेशन घेण्यात आले. यावेळी फक्त तालुकाच देण्यात आला. या समूपदेशनाला जिल्ह्यातील 200 पेक्षा जास्त शिक्षक हजर होते. सध्या फक्त या शिक्षकांना तालुकाच देण्यात आला असून 2 दिवसांत शाळा देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. या समूपदेशनाला मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत उपस्थित होत्या.