चिपळूण:-राज्य उत्पादन शुल्कच्या रत्नागिरी भरारी पथकाने तालुक्यातील वैजी येथे 11 लाख 64 हजार 600 रुपये किंमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा पकडल्याची खळबळजनक घटना काही दिवसापूर्वी घडली. एका गोठ्यामधून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गोविंद नामदेव करकाळे (36, वालोपे), विजय कृष्णा पवार (50, कांदिवली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या सर्व अधिकाऱ्यांची नूतन अधीक्षक किर्ती शेडगे यांनी बैठक घेत त्यानुसार गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक व साठ्याकडे लक्ष केंद्रीत करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. जिल्हा भरारी पथकाचे निरिक्षा पाडाळकर, दुय्यम निरीक्षक यादव, मानस पवार, वाहन चालक धोत्रे गेल्या काही दिवसांपासून मंडणगडपासून चिपळूण पर्यंत गस्त घालत असताना या पथकाला वैजी वाकण येथे एका गुरांच्या गोठ्याला गोडावून बनवून त्यात गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सोमवारी 5.30च्या सुमारास धाड टाकली. यात एका गुराच्या गोठ्यातून 11 लाख 64 हजार 600 रुपये किंमतीचा गोवा बनावटीच्या मद्याचा साठा आढळला. हा साठा जप्त करण्यात आला.
चिपळुणात 11 लाखाचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त, दोघांवर कारवाई
