सचिन पिळगावकर यांची जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मात्र…
रत्नागिरी/प्रतिनिधी:-प्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येतोय. नुकतंच या दुस्रया भागात कोणते कलाकार झळकणार हे जाहीर करण्यात आलंय. या चित्रपटाचा काही भाग गणपतीपुळे येथे चित्रीत होणार आहे. यासाठी सचिन पिळगावकर यांनी रत्नागिरी जिल्हाप्रशासनाकडे या चित्रिकरणासाठी परवानगी मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती मात्र चित्रिकरणाची तारीख जवळ आली तरीही जिल्हाप्रशासनाकडुन चित्रीकरणासाठी परवानगी अद्याप मिळाली नसल्याचे बोलले जात आहे.
अभिनेते तसेच निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर हे आता पुन्हा एकदा तब्बल 19 वर्षांनंतर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग ‘नवरा माझा नवसाचा 2′ हा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटातील काही भाग रत्नागिरी रेल्वेस्थानक आणि गणपतीपुळे मंदिर परिसरात चित्रीत होणार आहे. यासाठी सचिन पिळगावकर यांनी फेबुवारी महिन्यात चित्रिकरणाच्या परवानगीसाठी स्वत जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी गणपतीपुळे येथे जावुन श्रींचे दर्शनही घेतले होते. मात्र 15 दिवसांनंतरही जिल्हा पोलीस विभागाकडुन सुरक्षीततेसंदर्भात कोणताच अहवाल न मिळाल्याने जिल्हा पशासनाकडुन चित्रिकरणासाठी अद्याप परवानगी दिले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली असगर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार असे दिग्गज कलाकार या चित्रपटात झळकणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन चित्रपट 2004 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आणि आजही या चित्रपटातील प्रत्येक संवाद व गाणी प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. नवरा माझा नवसाचा चित्रपटात आपल्याला गणपती पुळेच्या सहलीची मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली आणि शेवटी गणपती बाप्पाचं दर्शन घडलं. आता या दुसऱ्या भागात नवस फेडायला वॅकी नेमका कुठे जाणार? तसेच या प्रवासात कोणकोणते ट्विस्ट येणार? आणि यामुळे काय धम्माल उडणार हे सर्व आपल्याला ‘नवरा माझा नवसाचा 2′ या चित्रपटात बघायला मिळेल
या चित्रपटाच्या पहिल्या भागात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर हे कलाकार झळकले होते. पण आता यापैकी रीमा लागू, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, आनंद अभ्यंकर या कलाकारांचं निधन झालं आहे.
पण आता या दुसऱ्या भागात काही नवीन कलाकारांसोबत अनेक जुने कलाकार तेच असणार आहे. या नवीन भागात कहाणी काय असणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही फार उत्सुक आहेत.