रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या प्रयत्नांना यश-अशोकराव कदम
चिपळूण (प्रतिनिधी):- रत्नागिरी जिल्ह्यातील ३१ रास्त भाव दुकानदारांना तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेल्या रास्त भाव परवानाधारकांना कायमस्वरूपी प्राधिकारपत्र रास्त भाव दुकान चालकांच्या नावे करण्याबाबत ‘एक विशेष बाब’ म्हणून शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या प्रयत्नांना यश आले आहे, अशी माहिती या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी दिली आहे.
जिल्ह्यात शेकडो रास्त धान्य दुकाने असून त्यातील काही दुकानदारांना २००१ ते २०१७ या काळात तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तात्पुरत्या स्वरुपात रास्तभाव धान्य दुकानांचे व्यवस्थापन मंजूर करण्यात आले होते. याच तात्पुरते आदेशाच्या आधारेच आजतागायत संबंधितांकडे वितरण व्यवस्थापन आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून संबधित ही दुकाने चालवीत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन ही दुकानेच आहेत. या दुकानदारांनी कोरोना काळात शिधापत्रिकाधारकांना चांगल्याप्रकारे सेवा दिली आहे.
आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणत्याही तक्रारी नाहीत. असे असताना तात्पुरते व्यवस्थापन असलेल्या रास्तभाव धान्य दुकानदारांकडे कोणत्याही प्रकारचे प्राधिकार पत्र नाही. हे पत्र मिळाल्यास शासन नियमानुसार देय होणारी अनामत रक्कम, प्राधिकार पत्र शुल्क, नुतनीकरण शुल्क आदी नियमानुसार भरण्यास ते तयार असून त्यांच्याकडे सदरचे व्यवस्थापन चालविण्यास पुरेशी जागाही उपलब्ध आहे.
हा विषय रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार केरोसीन चालक-मालक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम, रमेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले होते.
याची दखल घेऊन शासनाने रत्नागिरी जिल्ह्यातील ३१ रास्त भाव दुकानदार यांना तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेल्या रास्त भाव परवानाधारकांना कायमस्वरूपी प्राधिकार पत्र रास्त भाव दुकान चालकांच्या नावे करण्याबाबत ‘एक विशेष बाब’ म्हणून मान्यता दिली आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील १०, संगमेश्वर-देवरुख ३, राजापूर २, चिपळूण ५, दापोली ७, गुहागर ३, मंडणगड १ या ३१ दुकानांचा समावेश आहे. तसे पत्रशासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहे.
या विषयात जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी व पुरवठा विभागातील मनोज पवार, तालुकानिहाय पुरवठा अधिकारी यांचे महत्त्वपूर्ण सहकारी लागले. मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, आमदार शेखर निकम यांचे देखील महत्वपूर्ण सहकार्य लाभले आहे. या सर्वांचे रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने आभार मानत असल्याची प्रतिक्रिया रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील ३१ रेशन दुकानदारांचे परवाने कायम
