चिपळूण (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांस्कृतिक विभाग आणि राधा गोविंद फाउंडेशन यांच्या वतीने आणि आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार चषक २०२४ “जिल्हास्तरीय भव्य नमन स्पर्धा” आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या निमित्ताने चिपळूण तालुक्यातील लोककलावंताना “सह्याद्री कलारत्न पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. कोकणातील एक प्रतिभावंत शाहीर श्री.शाहिद खेरटकर यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेली अनेक वर्षे शाहीर शाहिद खेरटकर हे कोकणातील समृद्ध लोककला जाखडी (कलगी तुरा)या लोककलेची जोपासना करीत आहेत. यातून मनोरंजन याबरोबरच प्रबोधन हा त्यांच्या सादरीकरणातला मूळ गाभा आहे. कोकणातील गावागावात, वाडीवस्तीत तसेच मुंबई पुण्याच्या रंगमंचावर शाहीर शाहिद खेरटकर यांचा आवाज रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कलाकार म्हणून आपली भूमिका बजावत असतानाच आपल्या लोककलावंताना शासन दरबारी न्याय मिळाला पाहिजे यासाठी देखील ते संघर्ष करीत आहेत. नमन लोककला संस्था(कार्यक्षेत्र भारत) या संस्थेचे ते महासचिव आहेत तर कलगी तुरा समन्वय समितीचे सदस्य आहेत. याआधी शाहिद खेरटकर यांना शाहीररत्न, कलारत्न काव्यरत्न तसेच विश्वसमता कलाभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. नुकताच त्यांचा “ललकारी” हा कविता संग्रह देखील प्रकाशित झाला आहे. शाहिरांच्या या एकूण कला, साहित्य आणि सामाजिक योगदानाबद्दल त्यांना आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या “सह्याद्री कलारत्न पुरस्कार” याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
शाहीर शाहिद खेरटकर “सह्याद्री कलारत्न” पुरस्काराने सन्मानित
