उदय गोताड यांनी जाहीर केली गाव विकास समितीची भूमिका
रत्नागिरी:- राज्य शासनाच्या माध्यमातून कोकणातील किनारपट्टीच्या भागात सिडको प्राधिकरणाची नियुक्ती करण्याबाबतचा जो निर्णय झाला आहे, त्याला संपूर्ण कोकणातील जनतेने विरोध करायला हवा. बिल्डर धाजिरने आणि धनदांडग्यांच्या साठीची धोरण राबवणारे सिडको प्राधिकरण कोकणात नको,कोकणच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना बळ द्या अशी रोखठोक भूमिका गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी संघटनेच्या वतीने जाहीर केली आहे.
कोकण किनारपट्टीच्या भागातील गावे सिडको प्राधिकरणाच्या अखत्यारीत देण्याबाबत शासनाने निर्णय का घेतला? याबाबतचे कारण शासनाने जाहीर करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनाने बळ दिल्यास आणि निधी उपलब्ध करून दिल्यास त्या त्या भागाचा विकास होऊ शकतो. सिडको प्राधिकरण हे बिल्डर धाजिरने असून भविष्यात कोकण भकास आणि व्यावसायिक लोकांच्या घशात घातले जाईल अशी भीतीही उदय गोताड यांनी व्यक्त केली आहे. शासनाला कोकणासाठी काही करण्याची इच्छा असेल तर कोकणसाठी स्वतंत्र विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी करावी व त्या विकास प्राधिकरणावर कोकणातील स्थानिकांना प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणीच उदय गोताड यांनी केली आहे.