देवरुख प्रतिनिधी:- देवरुख साखरपा मार्गावरील बावनदी येथे दुचाकी व टेम्पो यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात चाफवली येथील २५ वर्षीय तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे.
सिद्धेश बळीराम गावडे असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सिध्देश हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन रविवारी रात्री ११ वाजता देवरुखहून चाफवलीच्या दिशेने जात होता. तर टेम्पो साखरप्याहून देवरुखच्या दिशेने येत होता. बावनदी पुलापासून काही अंतरावर दुचाकीची टेम्पोला धडक बसून अपघात घडला. सिध्देश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी तात्काळ रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास सिध्देश याची प्राणजोत मालवली. सिध्देश याचा मृतदेह सायंकाळी चाफवली गावी आणण्यात आला. येथीलच स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिध्देश हा नमनातील नावाजलेला कलाकार होता. नमनाचे अनेक कार्यक्रमात कला पेश करत रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. सिध्देश याच्या अचानक जाण्याने चाफवली ग्रामस्थ व नमन कलाकारांनी शोक व्यक्त केला.