चिपळूण : राधा गोविंद फाउंडेशन पुरस्कृत मुक्तांगण आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त विशेष सोहळा मुक्तांगण नृत्य कलाविष्कार हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. सावर्डे, चिपळूण पंचक्रोशीतील अनेक कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये एकूण २१ कलाकृती सादर करण्यात आल्या. वैयक्तिक व सामूहिक अशा स्वरूपात कलाकृती सादर केल्या गेल्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व परीक्षक म्हणून ललित कला अकादमी येथील शास्त्रीय नृत्यांगना सौ शिल्पा भिडे आमंत्रित केले गेले होते.
“सन्मान नारीचा, त्यागाचा आणि शौर्याचा” हा एक कार्यक्रम त्या अंतर्गत घेण्यात आला. त्यामध्ये सावर्डे येथील सर्व महिला पोलीस व पोलीस पत्नी यांना आदरणीय पूजाताई निकम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष सौ पूजा निकम यांनी मनोगत व्यक्त करताना संपूर्ण समाजाच्या संरक्षणासाठी ज्या स्वतः आपला संसार सणवार उत्सव बाजूला ठेवून सर्वांची काळजी घेतात अशा सर्व महिला पोलीस व त्याचबरोबर अशा पोलीस पत्नी की समाज रक्षणासाठी आपल्या पतींना कायम पाठिंबा देणाऱ्या महिलां यांचा त्याग आणि शौर्य हा प्रत्येक स्त्रीसाठी गौरव करण्यासारखा आहे. संपूर्ण समाज त्यांचा ऋणी आहे. असे सांगत पोलीस पत्नी सौ.आदिती अभिजित गावणग यांनी आपल्या पतीला किडनी देऊन करून आधुनिक काळात देखील सत्यवानाचे प्राण वाचवणाऱ्या सावित्री प्रमाणे कार्य केले आणि संपूर्ण स्त्री जातीसमोर आपल्या संस्कृतीचा आदर्श घालून दिला अशी भावना व्यक्त केली.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सावर्डे येथील सरपंच सौ समीक्षा बागवे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले एकूण २१ कलाकृतीमध्ये पारंपारिक नृत्य, शास्त्रीय नृत्य लोककला, समाज प्रबोधन, शिवजन्म सोहळा अशा विविध स्वरूपात कलाकृती सादर करण्यात आल्या.