लांजातील तरूणावर बलात्काराचा गुन्हा दाखल
लांजा:-फेसबुकवर झालेल्या ओळखीतून घटस्फोटीत महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे अमिष दाखवत आपल्या घरी बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नास नकार दिल्याप्रकरणी संबंधित महिलेने लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार साटवली भंडारवाडी येथील स्वप्नील रविंद्र आंबोळकर उर्फ बबलू याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना १७ मार्च २०१८ ते २२ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडली.
या घटनेबाबत संबंधित पीडित महिलेने सोमवार ४ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार मार्च २०१८ मध्ये संबधित पीडित महिलेच्या फेसबुक अकाउंट वर स्वप्नील रवींद्र आंबोळकर याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. ती फ्रेंड रिक्वेस्ट तीने एक्सेप्ट केली. तेव्हापासून स्वप्नील आंबोळकर याच्याशी तीचे फेसबुक वर बोलणे सुरू झाले. स्वप्नीलने मला तू आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करेल असे मजकूर फेसबुकवर संबंधित महिलेला पाठवले होते. सुरुवातीला त्याकडे तीने दुर्लक्ष केले होते, मात्र त्यानंतर स्वप्नील सातत्याने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असल्याने तिने त्याला ब्लॉक करून टाकले. त्यानंतर २०२१ मध्ये पीडीत महिलेने मोबाईल बदलला. परंतु स्वप्नील आंबोळकर याने पुन्हा तिच्या मोबाईलवर कॉल करण्यास सुरुवात केली आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे असा मेसेज पाठवून लग्नासाठी तगादा लावला होता.
यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये स्वप्नीलने लांजा तालुक्यातील आपल्या साटवली येथील घरी तिला बोलावल्याने संबधित पीडित महिला एसटीने साटवली येथे स्वप्नीलच्या घरी गेली. त्यानंतर ती रात्री त्याच्या घरी झोपलेली असताना त्याने रात्रीच्या वेळेस तिच्या रूम मध्ये येऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने त्याला प्रतिकार केला असता त्याने तू कोणाला घरात सांगू नको मी झालेला प्रकार माझ्या आईला सांगतो. असे सांगितले त्यानंतर ती सकाळी उठून तिच्या घरी गेली. त्यानंतरही स्वप्नील तिला सारखा फोन करून आय लव यू बायको, गुड मॉर्निंग असे मेसेज करत होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये स्वप्नील आंबोळकर याने फोन करून संबधित पीडित महिलेला त्याच्या घरी बोलावून घेतले. त्यावेळी ती महिला दोन दिवस त्याच्या घरी साटवली येथे थांबली होती. त्यावेळी स्वप्नीलने घरातील भाऊ, आई यांना संबधित महिला माझी मैत्रीण आहे अशी ओळख करून दिली होती. त्यानंतर पुन्हा त्याने त्यावेळी तु माझी बायको आहेस असे म्हणत लग्नाचे अमिष दाखवून संबंधित महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते.
स्वप्नील आंबोळकर याने संबधित महिलेला एप्रिल २०२४ मध्ये लग्न करूया असे सांगितले होते. त्यानंतर दोघांचे बोलने सुरु असताना काही दिवसांनी स्वप्नीलने तिच्याशी फोनवर बोलणे बंद करून बोलणे टाळू लागला. संबधित महिलेने लग्नाचे विचारले असता मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, तू कोणीतरी चांगला मुलगा बघून लग्न कर असे सांगून स्वप्नीलने फोन बंद केला. स्वप्नीलच्या अशा प्रकारच्या बोलण्यावरून लग्न करण्याची बतावणी करत शरीर संबंध ठेवून आपली फसवणूक झाल्याचे संबंधित पीडित महिलेच्या लक्षात आले, असे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, संबंधित पीडित महिलेने लांजा पोलीस ठाण्यात या प्रकरणी केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी स्वप्नील रवींद्र आंबोळकर उर्फ बबलू याच्यावर भा.दं.वि कलम ३७६ प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.