गणपतीपुळे/वैभव पवार:-कोकणातील ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा पायाभूत विकासाकरीता शाश्वत वाढीव निधी उपलब्ध होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत तीर्थक्षेत्रांना सुमारे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळे आणि सिंधुदुर्ग जिह्यातील कुणकेश्वर या प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे.
अयोध्यास्थित प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर विकास या संकल्पनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महत्वपूर्ण अशा ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेस मंजुरी देण्यात आली. या योजनेतंर्गत कोकणातील ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांना दोन कोटीऐवजी पाच कोटींचा विकासनिधी उपलब्ध करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक आणि यात्रेकरूंना विविध सोयीसुविधा पुरवणे आवश्यक आहे; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंजा उत्पन्नामुळे या सोयीसुविधा पुरवणे शक्य होत नाही म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तीर्थक्षेत्रांना नवीन प्रस्तावित निकषाप्रमाणे 3 कोटी इतका निधी मंजूर करण्यात येणार आहे.
प्रादेशिक योजनेत आणखी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीमधून विविध सुविधा निर्माण करण्यास मदत होणार आहे. त्यामध्ये तीर्थक्षेत्राकडे जाणारे रस्ते, पथदीप, मंदिर परिसर, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, स्नानगृह, भाविकांसाठी भक्तनिवास, परिसर सुशोभीकरण, वृक्षारोपण, वाहनतळ यासंह पर्यटकांची सुरक्षितता, अशा विविध सुविधा या ठिकाणी करता येणार आहेत
पर्यटनवाढीला मदत
ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत मिळणाया निधीतून भाविकांसाठी भक्तनिवास, रस्ते, पथदीप, वाहनतळ, वृक्षारोपण, पाण्याची व्यवस्था करता येणार आहे. त्याचा उपयोग पर्यटनवाढीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतून गणपतीपुळेचा होणार विकास
