बारावीत ४ वेळा नापास तरीही जिद्दीने मिळवली पोलिसाची नोकरी
रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्यातील उक्षी सारख्या ग्रामीण भागात गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीने, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर राज्य सुरक्षा दलात आपली मोहर उमटवली आहे. अशा या जिद्दी मुलीचं नाव आहे मयुरी जाधव.
ती सद्या बारामती येथील मुख्यालयात कार्यरत आहे. तिने आपल्या कुटुंबाची आणि आपण पोलीस दलात कशाप्रकारे सामील झालो याची निसंकोच कहाणी सांगितली आहे. ती म्हणते की, घरात हलाखीची स्थिती होती. वडील अपंग तरीही जमेल तसे काम करून उदरनिर्वाह करायचे. आई मोलमजुरी करून कसाबसा घराचा डोलारा सांभाळत होती. मयुरी ही नवनिर्माण शिक्षण संस्था रत्नागिरी येथून परीक्षा देत होती. मात्र नियती तीची कसोटीच पहात होती. बारावीला चक्क चार वेळा फेल झाली होती. याच कारणही तिने सांगितल आहे. बारावीला पहिल्या वेळी परीक्षेला बसली तेव्हा मुंबईला आईच मणक्याच ऑपरेशन होत. आई रुग्णालयात ऍडमिट होती आणि त्याच चिंतेत मयुरीने परीक्षा दिली. परिणामी नापासचा रिझल्ट हाती पडला. दुसऱ्या वेळी जुलै दरम्यान पुन्हा परीक्षेला बसली. त्यावेळी आई घरात आजारी.सगळी कामे मयुरी हीलाच करावी लागत होती.अभ्यासाला पुरेसा वेळ देता येत नव्हता.म्हणून यावेळीही ती नापास झाली. मधल्या कालावधीत तिने आता नोकरी करून शिक्षण घ्यायचं ठरवलं. तिसऱ्या वेळी पुन्हा परीक्षेला बसली. अभ्यास सुद्धा केला होता. मात्र इथेही माशी शिंकली. ऐन परीक्षेच्या दिवशी ज्या ठिकाणी नोकरी करत होती त्या मालकानेच परीक्षेला जाऊ दिलं नाही. मयुरीची पुरती निराशा झाली. अशा एक ना अनेक अडचणी ऐन परीक्षेच्या वेळी येत होत्या. आता मात्र तिने निश्चय केला होता की चौथ्या वेळी परीक्षा पास व्हायचं. तिने अभ्यासाला पुन्हा जोमाने सुरुवात केली. अभ्यासाबरोबर ती सकाळी मैत्रिणीबरोबर धावायला जायची. त्यावेळी तिने पोलीस भरतीचा विचार सुद्धा केला नव्हता. दरम्यान यावेळी बारावीचे पेपर सुटतील असे वाटत होते. पण यावेळीही ती नापास झाली.वारंवार अडचणी येत होत्या.
दरम्यानच्या कालावधीत तिने दुसरी नोकरी पत्करली. सकाळी धावत असताना मैत्रिणीने सांगितले की त्या सरांनी अनेकांना पोलीस भरती मध्ये उत्तीर्ण केले. मात्र स्वतः कधीच सिलेक्ट झाले नाही. मैत्रिणीने तिला सांगितले तुझी उंची चांगली आहे. धावतेस ही मग तू सुद्धा पोलीस भरतीला उतर. तिने आपली माहिती सांगितली. आपण बारावीचे पेपर देत आहोत असे सांगितले. त्यावेळी मयुरीच्या मनात पोलीस भरतीचा विचार आला. आपणही पोलीस भरतीला उतरावं. एका मित्राने धावण्याचा सराव करायला सांगितले. सराव करता करता तिला त्याने अभ्यास करायला सांगितले. सराव चालूच होता.
आता कोणत्याही परिस्थितीत बारावी शिकून पोलीस दलात जायचं होत.पाचव्या वेळी पुन्हा परीक्षेला बसली. यावेळी तिने बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिचा आनंद गगनात मावेना.
दरम्यान पुण्याला कामानिमित्त गेलेली असताना एका मुलाशी मैत्री झाली आणि त्याने तिला लग्नाची मागणी घातली. लग्नही झाले. पती एका खासगी नोकरीत आहेत. पुण्याला ती स्थायिक झाली. यावेळी तिचे पती तिच्या पाठीशी ठाम राहिले. तुला पोलीस भरती मध्ये जायचं आहे ना माझं पूर्ण सहकार्य आहे. त्याच्या पाठिंब्यावर तिने पुन्हा सरावाला सुरुवात केली. सकाळी उठल्यानंतर धावणे, गोळा फेक, टायमिंग लावून धावणे यावर फोकस केला होता. रत्नागिरीच्या 2022 च्या पोलीस भरतीत भरतीत सिलेक्ट झाली. तिच्या सासरच्या आणि माहेरच्या घरात आनंदाचे वातावरण् होते. शेवटी ट्रेनिंग साठी जावं लागलं. ट्रेनिंग दरम्यान खूप त्रास होत होता. तिला सहन होत नव्हतं. सोडून द्यावं आणि जावं घरी अशा स्थितीत होती. तिने पतीला याबाबत सांगितले. मात्र पतीने तिला धीर दिला. एवढ्या मोठ्या प्रयत्नांनी तू इथपर्यंत पोचली आहेस. आता थोडा त्रास सहन करावा लागेल. एकदा ट्रेनिंग संपल की तुझा त्रास सुटला. हीच तुझी खरी परीक्षा आहे. हे सांगितल्यावर तिला धीर मिळाला. ती आणखी उत्साहाने ट्रेनिंग मध्ये सामील झाली. आणि ट्रेनिग संपून ती बारामती येथील पोलीस मुख्यालयात तिला पोस्ट मिळाली.
‘पती’ मुळे हे शक्य झालं
मयुरी हिच्याशी संपर्क साधला असता तिने सांगितले, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते अस म्हणतात पण माझ्या यशाच्या मागे माझे पतीराज त्यांच्यामुळे आणि घरातील लोकांच्या पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले.