आ.गोगावले यांनी विश्रामगृहासाठीही मागितले अन् पालकमंत्री ना.सामंत यांनी दिले
पोलादपूर:- उमरठ येथील समाधी आणि पुतळा परिसराच्या सौंदयीकरणासाठी यापुर्वी राज्यसरकारने 5 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केला. आ.गोगावले यांनी आणखी उमरठच्या सुशोभिकरणासाठी 10 कोटीचा निधीचा निधी मागितला. शौर्य आणि स्वामीनिष्ठेसाठी नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा, तैलचित्र, गडकिल्ल्यांची प्रतिकृती उमरठला दिला जाईल. असंख्य मावळयांनी छत्रपतींना साथ दिली त्यांच्या आदर्शावर आपले सरकार प्रेरित आहे. रायगडच्या शिवसृष्टीला 50 कोटी रूपये मंजूर केले आहेत. पोलादपूरहून पुढे प्रतापगडाच्या परिसरामध्ये जिवा महाला यांच्या शौर्यासाठी स्मारक उभारणार असून ऐतिहासिक वारसा समृध्दपणे पुढच्या पिढीसमोर मांडण्यासाठी 258 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचे यावेळी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांचा शौर्यदिन सोमवारी झाल्यानंतर मंगळवारी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीदिनी समाधी व स्मारकाच्या सुशोभिकरण सोहळयाचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. यावेळी रायगडचे पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले, युवासेना कोकणप्रदेश अध्यक्ष विकास गोगावले, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर, शिवशाहिर वैभव घरत,यंदाचा सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे शौर्य सेवा पुरस्कार 2024 प्राप्त ज्येष्ठ इतिहास संकलक बाळकृष्ण तथा आप्पासाहेब परब, जिल्हाधिकारी किसन जावळे, सा.बां.विभाग रायगड अधिक्षक अभियंता सुषमा गायकवाड, पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दिप्ती गाट, पोलादपूर उपविभाग सा.बां. उपअभियंता अमृत पाटील, नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट उमरठचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे, रामदास कळंबे तसेच आरोग्यदूत मंगेश चिवटे आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी रायगडचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी, उमरठच्या विश्रामगृहाच्या सुधारणेसाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधीची उपलब्धता करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी किसन जावळे यांना आदेश दिले आणि वडू गावातील संभाजीराजांचे स्मारक उभारण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीसरकारच्या निर्णयानंतर दुर्दैवाने ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागणाऱ्यांनी या निर्णयाविरोधात विरोधाचा सूर काढला, अशी टीका केली. पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरण परिसरातील ज्या जमिनी उद्योग मंत्रालयाच्या ताब्यात आहेत आणि त्याचा वापर झाला नाही अशा जमिनींपैकी काही जमिन पोलादपूर तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी उपलब्ध केल्यास संकुलासाठीचा 10 कोटींचा निधी उपलब्ध होऊ शकेल, असे आ.गोगावले यांनी सांगितल्यानुसार रायगड जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्री ना.सामंत यांनी केले.
यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणातून सीमेवर जाणाऱ्या तरूणांचे प्रमाण महाड पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक असल्याचा सार्थ अभिमान आहे. गडकोट किल्ले हे आपले ऐश्वर्य आहे. देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती या भागात सर्वाधिक आहे. यामुळेच हिंदवी स्वराज्य स्थापनेमध्ये याभागातून जिवाला जीव देणाऱ्यां मावळयांची संख्या अधिक असल्याचे इतिहासामध्ये दिसून येत असल्याचे सांगून महाड तालुक्यातील मुरारबाजी देशपांडे यांच्या स्मारकाचे कामही महायुती सरकारने लवकरच हाती घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी आपल्या भाषणामध्ये केले.
प्रारंभी प्रास्ताविकामध्ये आ.गोगावले यांनी, नरवीर तानाजी मालुसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे मुलगा रायबाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गेल्यावर ‘आधी लगीन कोंढाण्याची मग माझ्या रायबाचे’ अशी स्वराज्याप्रती निष्ठा दाखवून मोहिमेवर जाऊन जिवाची बाजी लावली. त्यांचा पुतळा आणि समाधीस्थळी सुशोभिकरण होत असताना त्यांचा वाडा आणि सर्वच परिसराच्या ऐतिहासिक सौंदर्यीकरणासाठी 10 कोटीची तरतूद झाल्यास संपूर्ण उमरठ पर्यटनस्थळ म्हणून विकास होऊ शकेल, असे आवर्जून सांगितले.
यानंतर भुमिपूजन होऊन व्यासपिठावरील ऑनलाईन उदघाटनाचा कार्यक्रमाचा समारोप झाला. सकाळी समाधीस्थळी अभिषेक व पुजाविधी, ध्वजारोहण, नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा समाधीला पुष्पचक्र अर्पण, वीणारोहण, पुतळयास पुष्पहार अर्पण आदी कार्यक्रमांनंतर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, शिवशाहिर वैभव घरत यांचा शाहिरी पोवाडा सादर झाला. शिक्षण कृषी आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन यांच्या सहभागाने नरवीर तानाजी मालुसरे यांची पालखी मिरवणूक, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, राजिप शाळांतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. रात्री मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.