संस्थानाचे रक्तसंकलनाचे कार्य गौरवास्पद – मंत्री उदय सामंत
नाणीज- जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानने महाराष्ट्रासह अन्य राज्यांत केवळ 15 दिवसांत 81260 कुपिका रक्तसंकलन केले हा जागतिक विक्रम असू शकतो, असे गौरवोद्गार राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढले. विक्रमी रक्तदानाबद्दल जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांना राज्य सरकारतर्फे मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
संस्थानच्या संतशिरोमणी गजानन महाराज प्रगट दिन व आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज यांच्या जयंती सोहळ्यात सुंदरगडावर हा कार्यक्रम झाला. यावेळी महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. महेंद्र केंद्रे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांना शासनातर्फे देण्यात आलेले मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच महारक्तदान शिबिरात चांगले कार्य करणाऱ्या केंद्रांचा, जिल्ह्यांचा व उपपीठांचा गौरव करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी दै. रत्नागिरी टाईम्सचे संपादक उल्हासराव घोसाळकर होते.
यावेळी मंत्री सामंत पुढे म्हणाले,“ आता हे पीठ देशपातळीवरचे राहिले नाही. प.पू. कानिफनाथ महाराज यांनी या पिठाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. आज संस्थानच्या माध्यमातून अनेक विकास कामे होत आहेत. विक्रमी रक्त संकलनामुळे हे सिद्ध होते की, संस्थानचा आरोग्य विभाग राज्य सरकारच्या आरोग्य विभागापेक्षा अधिक सक्षम आहे. कारण संस्थानची रुग्णवाहिका सरकारच्या रुग्णवाहिकेच्या अगोदर अपघातस्थळी पोहोचते. संस्थानचे डॉक्टर अगोदर पोहोचतात. सरकार जास्तीतजास्त पाचशे बाटल्या रक्त संकलीत करते, पण संस्थान आमचे डोळे पांढरे होतील एवढे रक्तसंकलन करते. म्हणजे देशातले सर्वात मोठे आरोग्य खाते नाणीज संस्थान चालवते.”
श्री उल्हास घोसाळकर म्हणाले,“ संस्थानचे रक्तदान, देहदानसारखे कार्य प्रचंड आहे. त्याचे सारे श्रेय जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांना जाते. त्यांनी संकल्प केला की तो लगेच पूर्ण केला जातो. त्याला भक्तांचीही मोठी साथ असते.”
यावेळी डॉ. महेंद्र केंद्रे म्हणाले,“ संस्थानने मोठ्या संख्येने रक्त संकलन करून शासनाला मोठा हातभार लावला आहे. त्यातून राज्याची साधारण 40 दिवसांची गरज भागली आहे. या रक्तदान कार्यक्रमातून महाराजांनी त्यांचा ‘तुम्ही जगा, इतरांना जगवा’, हा उपदेश प्रत्यक्षात आणला आहे.” कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थानाचे सीईओ सुनील ठाकूर यांनी केली.
संस्थानच्या महारक्तदान सोहळ्यात उत्कृष्ट रक्तसंकलन कार्याचा सत्कार करण्यात आला. तो असा- 1) उपपीठ मराठवाडा 2) मुंबई 3) क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र.
उत्कृष्ट जिल्हा – 1) छत्रपती संभाजीनगर,2) पुणे 3) मुंबई उत्कृष्ट कॅम्प- 1) बजाज नगर- छत्रपती संभाजीनगर पश्चिम. 2) अप्पापाडा, मालाड, मुंबई 3) कामराज नगर-, घाटकोपर.