लांजा:-तालुक्यातील साटवली मुस्लिमवाडी येथील तरुण बेपत्ता झाला असून बहिणीच्या घरातून साटवली येथे उरूसाच्या कार्यक्रमासाठी जातो असे सांगून गेला, मात्र घरात न परतल्याने त्याच्या बहिणीने लांजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, इम्रान शौकत बरमारे (वय-३५, रा.साटवली मुस्लिमवाडी, ता.लांजा, जि.रत्नागिरी) हा तरुण रविवार दि.२ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याची बहीण लुबना ईब्राहीम वणु (वय ३०, रा.लांजा, कनावजेवाडी ता.लांजा) येथील हिच्या घरातून साटवली येथे संदल आणि उरुसासाठी जातो असे सांगून निघून गेला. त्यानंतर ३ मार्च रोजी फिर्यादी लुबना वणु यांचे पती इब्राहिम वणु यांनी इम्रान यास दुपारी १२ वाजता फोन केला असता तेव्हा त्याने लांजा येथे येत आहे असे सांगितले. परंतु, त्यानंतर देखील आपला भाऊ घरी परत न आल्याने लुबना वणु यांनी आजूबाजूतील परिसरात त्याचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांकडे फोन करून चौकशी केली, सर्वत्र शोध घेऊनही काहीच थांगपत्ता लागत नसल्याने अखेर लुबना वणु यांनी मंगळवार दिनांक ५ मार्च रोजी लांजा पोलीस स्थानकात इम्रान बरमारे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
तरी सदर व्यक्ती कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पोलीस स्थानकात संपर्क साधावा असे आवाहन लांजा पोलीसांच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पो.हेड.कॉन्स्टेबल टी.एस.मोरे करत आहेत.