गुहागर:-तालुक्यातील हेदवी हेदवतड येथील हरिश्चंद्र गजानन पिंपरकर यांच्या मालकीच्या किराणामाल व पिठाची चक्की दुकानाला आग लागली. यामध्ये दोन्ही दुकाने जळून खाक झाली असून रूपये 13 लाख 95 हजाराचे नुकसान झाले आहे.
सदर आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. हरिश्चंद्र पिंपरकर किराणामाल दुकान व चक्कीपासून पाच मिनिटाच्या अंतरावर राहतात. तर या किराणामाल व पिठाच्या चक्कीला लागून विजय वेल्हाळ, यशवंत नाटेकर, संदेश नाटेकर आदीं घरे आहेत. मध्यरात्री या नाटेकर कुटुंबातील एक व्यक्ती बाहेर आला असता दुकानामध्ये आग लागल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी तातडीने आपल्या शेजारील ग्रामस्थांना जागे केले.
दुकानमालक हरिश्चंद्र पिंपरकर यांना फोन लावून कळविण्यात आले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. दुकानाला लाकडी छप्पर असल्याने आगीचा तांडव सुरू होता. अशामध्ये शेजारील घरांना वाचवणे आवश्यक होते. येथील वाडीला पाईपलाईने पाणी पुरवठयाची 54 हजार लिटरची पाणी साठवण टाकी आहे. त्या टाकीला पाईपजोडून सदर आग विझवीण्याचा प्रयत्न केला. आग विझल्याने आजुबाजुची घरे वाचली. परंतु दोन्ही दुकानात केवळ लोखंडी पिठाची गिरणीचे अवशेष पहावयास मिळाले. तब्बल 4 वाजेपर्यंत गावातील सर्व ग्रामस्थांनी सदर आग आटोक्यात आणली.