लांजा:-शिपोशी येथे भरलेल्या नवव्या ग्रामीण साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या संमेलनात झालेल्या विविधरंगी कार्यक्रमांना रसिकांनी चांगली दाद दिली..
मुंबईतील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांच्या संकल्पनेतून गेली आठ वर्षे राजापूर आणि लांजा या दोन तालुक्यांमधील गावांमध्ये ग्रामीण साहित्य संमेलने भरवली जात आहेत. या मालिकेतील तीन दिवसांचे नववे ग्रामीण साहित्य संमेलन लांजा तालुक्यात शिपोशी येथे पार पडले. राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) आणि शिपोशी ग्रुप ग्रामपंचायत (ता. लांजा) यांच्या संयुक्त विद्यमाने न्या. वैजनाथ विष्णु आठल्ये विद्यामंदिराच्या परिसरात संमेलन झाले. गावात शिकलेले रियासतकार गो. स. सरदेसाई यांचे नाव संमेलनाच्या नगरीला देण्यात आले होते. त्यांच्यासह क्रांतिकारक गणेश गोपाळ आठल्ये यांच्याही आठवणी संमेलनात जागविण्यात आल्या. नद्या जपण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी काजळी नदीच्या जलपूजनाने संमेलनाला प्रारंभ झाला.
अशी छोटी साहित्य संमेलने खेड्यापाड्यातील माणसांपर्यंत साहित्याचा आनंद पोहोचवून, साहित्य-कलाविषयक जाण निर्माण करतात, स्थानिक प्रतिभांना व्यासपीठ आणि प्रोत्साहन देतात. मराठी भाषेवर हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा छोट्या संमेलनांसारखे उपक्रम आपल्या मातृभाषेच्या जतनात आणि संवर्धनात महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात. ही छोटी साहित्य संमेलने भाषेची आणि साहित्य-कलांची नवी ऊर्जाकेंद्रे आहेत. ती आपण प्रयत्नपूर्वक अधिक समर्थ आणि संपन्न केली पाहिजेत, असे विचार संमेलनाध्यक्ष विजय कुवळेकर यांनी मांडले.
प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. मराठी आणि ग्रामीण भागातील संस्कृती जपण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या संमेलनाचे त्यांनी कौतुक केले. प्रसिद्ध अभिनेते राजेश देशपांडे, माजी संमेलनाध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनीही या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले.
संमेलनात पुस्तके, विनायक महाबळ यांचे मोडी पुस्तक प्रदर्शन, विजयराज बोधनकर यांची चित्रे, सुनील कदम यांची शस्त्रास्त्रे यांच्या प्रदर्शनाबरोबरच स्थानिकांचे रांगोळी प्रदर्शनही भरवण्यात आले होते. गत शेतकऱ्यांच्या झोपडीची प्रतिकृती साकारण्यात आली होती.
उद्घाटनानंतरच्या सत्रात स्वरा साळवी, आर्या यादव, वृंदा कोतापकर, आरोही फडतरे या तरुणांनी युवा व्यासपीठावरून आपले विचार व्यक्त केले. परिणाम (लेखक, कवी, चित्रकार विजयराज बोधनकर), छत्रपती संभाजी महाराज इतिहास (श्रीनिवास पेंडसे), कथा कशी सादर करावी (लेखिका, कथाकथनकार वृंदा कांबळी), जैवविविधता (पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे) या विषयावरील व्याख्याने झाली. कविसंमेलन, निमंत्रितांचे कविसंमेलन, कोकणचा साज संगमेश्वर बाज हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
अखेरच्या दिवशी शाहीर मधुकर खामकर आणि मंडळींच्या कार्यक्रमाला रसिकांनी ठेका धरून दाद दिली. गावात राहून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २५ जणांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. चंदूभाई देशपांडे आणि शाहीर मधुकर खामकर यांना जीवगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.