रत्नागिरी:-‘आतला आवाज ऐकतो मी.. लाड त्याचे टाळतो मी..’ असे एकास एक शेर-गझल आणि कवितांनी जनसेवा ग्रंथालयाचे काव्यसंमेलन बहरून गेले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने गझलकार देवीदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जनसेवा ग्रंथालयातर्फे रत्नागिरीतील प्रथितयश कवी, नवोदित कवींचे बहारदार काव्यसंमेलन पार पडले.
यावेळी निसर्ग, माणूस, मराठी भाषा अशा विविध विषयांवर कवींनी सुरेख कविता सादर केल्या.
संमेलनाचे अध्यक्ष देवीदास पाटील यांनी आपल्या गझलेतून लिहित्या हातांना साद घातली. त्यांच्यासोबत प्रथितयश कवयित्री सुनेत्रा जोशी, उमा जोशी, विजयानंद जोशी, गझलकार संजय कुळ्ये सहभागी झाले होते. तर नवोदित कवींमध्ये अथर्व भिडे, सचिन सनगरे, दुर्गेश आखाडे, विशाखा पाटोळे, वसुंधरा जाधव सहभागी झाले होते.
विशाखा पाटोळे यांनी आपल्या कवितेतून ‘अद्वैतदर्शन’ घडविताना ‘अहंता-ममता तव पायी लोप, व्हावी आपोआप निर्मिकारा’ अशी प्रार्थना केली, प्रा. सचिन सनगरे यांनी आपल्या कवितेतून किन्नराचे आयुष्य मांडताना ‘चर्चासत्र आणि परिसंवाद अंत नाही व्याख्यानाला, दाटून आले कंठ तृतीयपंथीयांच्या काव्यसंमेलनाला..’ असे सांगत असताना काव्यसंमेलन संपल्यानंतरची स्थिती मांडली. ‘सारे झाले आलबेल, जो तो निघाला घराकडे, चौकात सिग्नलपाशी थांबलेला तो.. आजही आला भीक मागायला’ अशा प्रवृत्तीचे चित्र त्यांनी मांडले, तेव्हा प्रेक्षकही स्तब्ध झाले.
पत्रकार आणि कवी दुर्गेश आखाडे यांनी आपल्या ‘करोडोंचं घर’ या कवितेतून पैशाच्या हव्यासापायी माणूस सुखापासून कसा दूर जातोय याचे विनोदी शैलीत सादरीकरण केले. ‘सकाळी लवकर उठायचं, रात्री फक्त झोपायला यायचं.. राहिलंय फक्त घराचं लॉजिंग करायचं, करोडोंचं घर घेतलंय, त्याला दिवसभर कुलूप घातलंय..’ अशी उदाहरणे देत त्यांनी आपली कविता सादर केली. अथर्व भिडे या नवकवीने ‘कोडं’ कविता म्हटली. एखाद्याच्या मनाचा थांग न लागणार्या माणसाबद्दल भिडे यांची कविता भाष्य करताना म्हणते, ‘तू कोडे मनास पडलेले, तू भास अंतरी दडलेले.. तू येशील म्हणता म्हणाताना, मृगजळ हवेत विरलेले..’ अशी स्थिती मांडली. प्रा. वसुंधरा जाधव यांनी कादंबरीकार शिवाजी सावंत यांच्या साहित्यसंपदेवर आधारित मुक्तछंदातील रचना सादर केली. मुग्धा कुळ्ये यांनी ‘मराठी भाषादिनानिमित्त’ सुरेल रचना सादर केली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने गझलकार विजयानंद जोशी, कवी शशिकांत राऊत, कवयित्री सुनेत्रा जोशी, आणि उमा जोशी यांनी आपले कवितासंग्रह जनसेवा ग्रंथालयाला भेट दिले. निमंत्रित कवींना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, तर मान्यवर कवींना ग्रंथालयाच्या परंपरेप्रमाणे ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर मीरा भावे यांनी संमेलनाचे सूत्रसंचालन केले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जनसेवाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, ग्रंथपाल सौ. सिनकर, अमोल पालये, सुजाता कोळंबेकर, सौ. भोसले यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला डॉ. शरद प्रभुदेसाई, प्रा. विवेक भिडे, श्री. नानिवडेकर यांच्यासह अनेक काव्यरसिक उपस्थित होते.