रायगड:-भाजपच्या विश्वगुरूंनी हिंदू जनआक्रोश मोर्चाची नवीन टूम काढली आहे. पण, तुम्ही दहा वर्षं सत्तेत असताना हिंदू तुमच्या राज्यात संकटात येत असतील तर तो तुमचा नालायकपणा आहे. तुम्ही सत्तेवर असताना हिंदूंना आक्रोश करावा लागतो, हे तुमचं अपयश आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी मोदी सरकारवर घणाघात केला.
खोपोली येथील जनसंवाद यात्रेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, आज माझ्याकडे काहीही नाही तरी जिथे जातो तिथे प्रचंड गर्दी होतेय. भाजपला आणि भाजपच्या भाडोत्री लोकांना उद्धव ठाकरेला शिव्या दिल्याशिवाय झोपच येत नाही. आज मी इथे आहे, अमित शहा तिथे जळगावमध्ये आले असतील. लिहून ठेवा की ते बाकीच्यांवरती बोलण्यापेक्षा ते उद्धव ठाकरेबद्दल बोलतील. कारण हा नुसता उद्धव ठाकरे नाही, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, हे त्यांना माहिती आहे. तुम्ही तुमच्या नालायक एजन्सीना हाताशी धरून कागदावर शिवसेना चोरण्याचा प्रयत्न कराल. पण इथे उपस्थित असलेल्यांच्या हृदयात असलेली शिवसेना कशी चोरणार?, असा रोखठोक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
भाजपच्या ढोंगी हिंदुत्वावरही त्यांनी आसूड ओढले. ‘त्यावेळेला भाजपला पाठिंबा दिला होता. कारण हिंदुत्ववादी सरकार हवं होतं, म्हणून 2014 आणि 2019ला नक्की पाठिंबा दिला होता. पण आता दहा वर्षांत जे रंग दाखवले ते भगवा सोडून सगळे रंग दाखवताहेत. भगवा रंग आणि हिंदुत्व हे यांचं थोतांड आहे, मुखवटा आहे. त्यांचं हिंदुत्व नकली, बोगस आहे. भाजप जे हिंदुत्व मानते ते मी मानणार नाही. कारण, हे हिंदुत्व मला माझ्या वडील आणि आजोबांनी शिकवलेलं नाही. यांचं हिंदुत्व हे नासकं-कुसकं आहे. पुन्हा बुरसटलेल्या गोमुत्राच्या हिंदुत्वात आम्हाला नेणारं यांचं हिंदुत्व आहे, हे आम्हाला कळलं असतं की तेव्हा त्याच वेळी आम्ही त्यांना सोडून दिलं असतं. आता सरळसरळ दिसतंय की मोदी देशासाठी जे करताहेत, ते घातक आहे. हा परिसर कामगारांचा परिसर आहे. लालबहादूर शास्त्रींचा नारा होता जय जवान, जय किसान. तसाच बाळासाहेबांनी सांगितलं होतं की यासोबत जय कामगार देखील असलं पाहिजे. जसं किसान अन्न पिकवतो, जवान रक्षण करतो, तसंच कामगार हा औद्योगिक क्षेत्रात काम करून देशाची अर्थव्यवस्था सांभाळतो. पण, आधी इथे किती उद्योग होते, कितीन नवीन आले आणि किती नवीन सुरू झाले? हे तुम्ही मला सांगा. आता दहा वर्षांनंतर सांगताहेत की आता देश समर्थ करणार, स्वावलंबी करणार. मग दहा वर्षं पंतप्रधान असताना तुम्ही काय गवत उपटत बसलेले होता का?’ असा घणाघाती सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
‘जगासमोर तुम्ही दाखवाल की हा आमचा हिंदुस्थान आहे, हा आमच्या देशातला हिंदू आहे. तो दोन धर्मांमध्ये आगी लावत फिरत नाही. आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. पण, आता हे विश्वगुरू तिथे बसल्यानंतर यांनी मध्ये नवीन टूम काढली. हिंदू जनआक्रोश मोर्चा. जर दहा वर्षं तुम्ही सत्तेत असताना जर हिंदू तुमच्या राज्यात संकटात येत असतील तर तुम्ही नालायक आहात. तुम्ही तुमच्या देशात संपूर्ण सत्ता मिळाल्यावरही हिंदूंना आक्रोश करावा लागतो हे तुमचं अपयश आहे’ अशी सणसणीत टीका उद्धव ठाकरे यांनी या सभेत केली.
तुम्ही सत्तेत असताना हिंदूंना आक्रोश करावा लागतो हे तुमचं अपयश आहे, उद्धव ठाकरेंचा घणाघात
