रत्नागिरी:-शहरालगतच्या उद्यमनगर पडवेकर कॉलनी येथे घरफोडी करून हजारो रूपयांचा ऐवज लंपास जाणाऱ्या संशयिताला पोलिसांकडून अटक करण्यात आल़ी. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आल़ी. लियाकत अब्दुल्ला नावडे (45 वर्षे, रा. कोकण नगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आह़े. त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख 66 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केल़ा.
रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या गुह्यानुसार 19 ते 25 फेबुवारी 2024 दरम्यान उद्यमनगर येथील घर बंद असल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी घरफोडी केली होत़ी. याप्रकरणी शहर पोलिसांत अज्ञातांविरूद्ध भा.दं.वि. संहिता कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी या दाखल गुन्ह्याचा तपास करण्याकरिता तात्काळ एक पथक तयार करून सदर पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या.
या पथकाकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू असताना रेकॉर्ड वरील अट्टल आरोपी लियाकत अब्दुल्ला नावडे याने केलेला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केल़ी. त्याचेकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व वापरलेली ऑटो रिक्षा असा एकूण 1 लाख 66 हजार रूपये किमतीचा मुद्दे माल हस्तगत करण्यात आल़ा.
आरोपी लियाकत अब्दुल्ला नावडे हा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर रत्नागिरी जिह्यात चोरी व घरफोडीचे विविध 11 गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक योगेश खोंडे, हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, सागर साळवी, वैष्णवी यादव, दत्ता कांबळे यांनी केल़ी.
उद्यमनगर येथील घरफोडीतील संशयिताल अटक
