संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कँरमपटू आकांक्षा कदमने आतापर्यंत तब्बल नऊ वेळा राज्यस्तरीय कँरमचे विजेतेपद पटकावले आहे. मुंबई येथे झालेल्या १५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेची ती दुसऱ्यांदा विजेती ठरली आहे.
मुंबई शिवाजी पार्क जिमखाना व महाराष्ट्र कँरम असोसियशन यांनी आयोजित केलेल्या १५ व्या राज्य मानांकन कँरम स्पर्धेत आकांक्षा कदम सहभागी झाली होती. तिने चैताली सुवारे,काजलकुमारी यांना पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत आकांक्षाने ठाण्याच्या समृद्धी घाडीगांवकरवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात १६-०८-१३, २४-०८-०९, २५-०७-०१ असे नमवून नवव्यांदा राज्यस्तरीय कँरमचे विजेतेपद पटकविले. तिने २०२२ मध्येही शिवाजी पार्क जिमखाना येथे झालेल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर तिचे हे दुसरे विजेतेपद आहे. आकांक्षा ही अवघी अठरा वर्षाची असून तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आकांक्षा कदम नऊ वेळा राज्यस्तरीय कॅरमची विजेती, मुंबईत पार पडली स्पर्धा
