रत्नागिरी:-तालुका गुरू रविदास विकास मंडळाच्या वतीने संत रविदास जयंती संत गुरू रविदास भवन,जाकादेवी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संत रविदास जयंतीच्या निमित्ताने सकाळच्या सत्रात समता फाउंडेशन मुंबई व जिल्हा रुग्णालय,रत्नागिरी यांच्या सहाय्याने तालुक्यातील समाज बांधव व परिसरातील लोकांसाठी मोफत नेत्र तपासणीचे आयोजन डॉ.परशुराम निवेंडकर यांनी केले होते.या नेत्र तपासणीचा १२० लोकांनी लाभ घेतला,यापैकी ४४ जणांना चष्मे वाटप करण्यात आले. चार जणांचे मोतीबिंदू निदान झाले असून या चौघांचे मोफत ऑपरेशन मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.नेत्र तपासणीचे काम डॉ. संदीप उगवेकर आणि डॉ. चिंतणेकर यांनी केले.
या कार्यक्रमात केजी ते पीजी यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.ज्या विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केली आहे त्यांच्या पालकांचा शाल श्रीफळ व साडी देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक प्रा.मिलिंद कडवईकर यांनी संत रविदास यांचा जीवनपट उलगडून दाखवताना त्यांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगावर प्रकाश टाकला.संत रविदास हे द्रष्टे संत होते,त्यांनी त्या काळात बेगमपुरा सारख्या स्वप्नांच्या शहराची संकल्पना मांडून आपलं महानत्व कसे सिद्ध केले ते त्यांनी समजावून सांगितले. यावेळी राष्ट्रीय रविदास परिषदेचे कोकण अध्यक्ष एस.व्ही.कदम यांनी संत रविदासांबद्दल विचार मांडताना समाजाने कर्मकांड व अनिष्ट रूढी परंपरातून मुक्त होण्याचे आवाहन केले.रत्नागिरीचे माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी सांगितले की, समाजाने संघटित होऊन काम करावे.समाज मंदिराच्या दुरुस्ती साठी समाजाला जी मदत लागेल ती आपण करण्यास तयार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष परशुराम निवेंडकर,उपाध्यक्ष प्रकाश खेडेकर,कार्यध्यक्ष जगन्नाथ फणसोफकर, यशवंत मेढेकर,सुहास वरेकर,सचिन चव्हाण,स्नेहा खेडेकर,संगिता वरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संध्याकाळच्या सत्रात उपस्थित भगिनींचा हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रामचंद्र मेढेकर यांनी केले तर आभारप्रदर्शन दत्ताराम मेढेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मयुर सैतवडेकर ,दीपक सैतवडेकर,राजेश चव्हाण,प्रतीक कोतवडेकर,राजेश खेडेकर,अमर सैतवडेकर,संदेश सैतवडेकर यांनी मेहनत घेतली.
जाकादेवी येथे संत शिरोमणी गुरू रविदास जयंती साजरी
