राजापूर:-सामाईक जमिनीतील झाडे विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादातून सैन्य दलात नोकरीला असलेल्या चुलत भावाने बेदम मारहाण केल्याची फिर्याद सुभाष राजाराम डांगे यांनी राजापूर पोलीस स्थानकात दिली आहे. त्यानुसार स्वप्निल दत्ताराम डांगे याच्या विरोधात पोलिसांनी भादंवि कलम 324, 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष डांगे व स्वप्निल डांगे हे चुलत भाऊ असून दोघेही एकाच वाडीत वास्तव्याला आहेत. स्वप्निल डांगे हे सैन्यदलात नोकरीला असून सध्या ते सुट्टीनिमित्त गावी आलेले आहेत. ताम्हाणे पहिलीवाडी येथे त्यांची सामाईक जमीन असून त्यामध्ये असणाऱ्या झाडांची विक्री केल्यानंतर त्याचे पैसे दोघांमध्ये वाटून घेतले जातात. बुधवार दि.14 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास स्वप्निल डांगे याने सुभाष यांना घरी बोलावून नेले. त्यावेळी स्वप्निल याने सुभाष यांना दारू पाजल्याचेही या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान सामाईक जमिनीतील खैराच्या झाडांच्या व्यवहाराचे बोलणे चालू असताना दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी स्वप्निल याने सुभाष यांना मारहाण करत डांबरी रस्त्याने ओढत नेले. तसेच लाकडी दांडक्यानेही मारहाण केल्याचे सुभाष यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये सुभाष यांच्या पाठीला, कानाला, कंबरेला, पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. स्वप्निल याने सुभाष यांना ओढत आणून त्यांच्या घराच्या पडवीत टाकून दिले. त्यानंतर सुभाष यांना उपचारासाठी रायपाटण येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तीन दिवस उपचार घेतल्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. मात्र त्याठिकाणी सुभाष यांच्या डोक्यात दुखू लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले असून सध्या त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तशी माहिती पोलिसांनी दिली.
राजापुरात झाडे विक्रीच्या व्यवहारातून चुलत भावाला मारहाण, कोल्हापूरला हलवले
