रत्नागिरी:-वीजग्राहकांना दर्जेदार आणि वाजवी किंमतीत वीजपुरवठा करण्यासाठी केंद्राच्या आर्थिक सहाय्यातून सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) राबवली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी या योजनेतून सुमारे 966 कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. केंद्राकडून अजूनही त्या प्रस्तावावर मंजुरीची पतीक्षा लागून राहिली आहे. हा प्रस्ताव मंजुरी मिळताच रत्नागिरी जिल्ह्यातील महावितरण ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
भविष्यातील वाढणारी विजेची मागणी व त्याची पूर्तता करण्यासाठी सध्याच्या वीज वितरण प्रणालीचे आणखीनच सक्षमीकरण व आधुनिकीकरणाची गरज आहे. ही बाब लक्षात घेत वीजपुरवठ्याची गुणवत्ता व ग्राहक सेवा अधिक दर्जेदार करण्यात येणार आहे. वीजहानी कमी करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. त्यासाठी केंद्राची ही सुधारित वितरण क्षेत्र योजना राबवण्यात येणार आहे.
या प्रस्तावात जिल्ह्यात 21 नवीन उपकेंद्रांच्या प्रस्तावासह 28 हजार नवीन विद्युत खांबांची मागणी करण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षापर्यंत तांत्रिक व वाणिज्यिक हानी कमी करणे, सरासरी प्रति युनिट वीजपुरवठ्यावर होणार खर्च आणि त्यापोटी प्रति युनिट मिळणारा महसूल यातील तफावत शून्यावर आणणे, ही आरडीएसएस योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. नवीन प्रस्तावातील पायाभूत सुविधा कार्यान्वित झाल्यास घरगुती, वाणिज्य तसेच औद्योगिक ग्राहकांची विनाव्यत्यय वीज वितरण करणे शक्य होणार आहे. जिह्यात महावितरण कंपनीची सद्या 55 उपकेंद्र आणि 195 फिडर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून सुमारे 6 लाख ग्राहकांना विद्युत पुरवठा केला जातो.
परंतु जिल्ह्याची भौगोलिक परिस्थितीमुळे डोंगराळ, दुर्गम भागात उपकेंद्रातील अंतर 100 मीटरच्या दरम्यान आहे. या अंतरामुळे एका उपकेंद्रावरील त्या परिसरातील ग्राहकाचा अतिरिक्त ताण वीजपुरवठ्यावर येत आहे. त्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे, कमी दाबाने विद्युत पुरवठा होणे, अशा अनेक अडचणी उभ्या राहत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. त्यामुळे अंतर कमी होऊन ग्राहकांची संख्या मर्यादित राहिल. त्यांना योग्य दाब व विनाखंडित विद्युत सेवा देता येईल, हा कंपनीचा उद्देश आहे. तसेच अनेक ठिकाणी विद्युतखांब गंजले आहेत. खराब झाले आहेत. यामुळे अपघात होण्यापासून ग्राहकांना विद्युत सेवा देण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. यासाठी हा प्रस्ताव महत्वपूर्ण ठरणार आहे. आणि त्यातूनच जिल्ह्याच हित होणार आहे.