चिपळूण:-चुलतीचा खून करुन पसार झालेला पुतण्याला अखेर 4 दिवसानंतर मंगळवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून प्रकाश हरचिलकर याला लोटे आवाशी दाभीळ फाटा परिसरातून ताब्यात घेत अटक केली. दरम्यान, पोलिसांना बघून पळताना पडल्याने प्रकाशच्या पायाला दुखापत झाली असून उपचारासाठी रत्नागिरी येथे नेण्यात आले आहे.
प्रकाश गणपत हरचीलकर (49, वालोपे-चिपळूण) असे अटक झालेल्या खूनी पुतण्याचे नाव आहे. वारकरी असलेल्या लक्ष्मी हरचिलकर या पंढरपूर येथील वारी करुन वालोपे येथे त्याच्या राहत्या घरी आल्या होत्या. असे असताना 23 फेब्रुवारी सकाळी 8 वाजता शेतकामासाठी लक्ष्मी हरचिलकर गेल्या होत्या. यावेळी पुतण्या प्रकाश याने एकटे गाठून जमीन वादाच्या रागाने त्यांच्या डोक्यात खिळा मारुन त्यांचा खून केला. त्यानंतर त्याने शेतामध्येच लक्ष्मी यांचा मृतदेह टायरसह पेंढा टाकून जाळला.
या घटनेनंतर पुतण्या प्रकाश दुचाकीवरुन वालोपे येथून पसार झाला होता. प्रकाश याच्या शोधासाठी चिपळूण पोलीस पथकाकडून तपास सुरु होता. यावेळी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले जात होते. असे असताना खुनाच्या घटनेनंतर गायब झालेला प्रकाश 4 दिवस होऊनही पोलिसांना न सापडल्याने आव्हान उभे राहिले होते. प्रकाश याला पकडण्यासाठी रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडूनही तपास सुरु होता.
यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला प्रकाश खेड तालुक्यातील आवाशी-दाभीळ फाटा परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार या शाखेने या परिसरात सापळा रचला. यावेळी प्रकाश हा दुचाकी ठेवून रस्त्याने पळत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या कट्ट्यावरुन उडी मारताना त्याला गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले. प्रकाश पळत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याच्या उपचारासाठी त्याला रत्नागिरी येथील सिव्हील रुग्णालयात नेण्यात आले आहे. तसेच त्याची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.