रत्नागिरी:-जयगड येथील किल्ल्याचे बुरूज आणि तटाला तडे गेले आहेत. जेएसडब्ल्यू कंपनी जयगड खाडीत वाळूउत्खनन करत आहे. त्यामुळे जयगड किल्ल्याचे नुकसान झाले आहे.
हा मुद्दा विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे मांडणार असल्याचे शिवसेना उपनेते आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.
ऐतिहासिक जयगड किल्ल्याच्या बुरुजाला आणि तटाला तडे गेले आहेत. पुरातत्त्व विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील दुर्लक्ष केले जात आहे. जेएसडब्ल्यू कंपनी जयगड खाडीत ड्रेजिंग करत आहे. त्याच्या कंपनामुळे जयगड किल्ल्याला तडे गेले आहेत. जयगड खाडी बचाव कृती समितीने ग्रामपंचायत सदस्या देवयानी खाडे यांनी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाला वाळू उत्खनन थांबविण्याबाबत पत्र दिले आहे. त्यानंतर शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांनी आज जयगड किल्ल्याची पाहणी केली. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात जयगड किल्ल्याच्या दुरवस्थेबाबत लक्षवेधी मांडणार असल्याचे श्री. साळवी यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, विभागप्रमुख उदय माने, संतोष हळदणकर आणि ग्रामपंचायत सदस्या देवयानी खाडे उपस्थित होत्या.