मुंबई:-मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणावर गेल्या दहा वर्षांत एकूण ६ हजार कोटी खर्च करण्यात आले असून दुरुस्तीवर तब्बल १९२ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
मात्र अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसून भविष्यात त्यावर आणखी खर्च होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या खर्चाच्या तुलनेत कामाचा दर्जा सुमार असून याची चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी केली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पावरील खर्चाची माहिती जितेंद्र घाडगे यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागितली होती. केंद्र सरकारच्या ‘एनएचएआय’ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गाच्या ४७१ किमी पट्ट्यांपैकी, ८४.६ किमी रस्त्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, तर उर्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. त्यानुसार २०१३ पासून, त्यांनी नवीन रस्त्यांवर १,७७९ कोटी ८५ लाख ५७ हजार ११० रुपये आणि दुरुस्तीच्या कामावर १४५ कोटी ८२ लाख ३६ हजार ९२६ रुपये खर्च करण्यात आले आहेत. दुसरीकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पेण कार्यालयाचे अभियंता आर. बी. कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चौपदरी महामार्गासाठी २,३५४ कोटी ७२ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात आले असून, दुरुस्तीच्या कामासाठी कोणताही खर्च करण्यात आलेला नाही. यामध्ये नवीन रस्त्यांची देखभाल न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रत्नागिरी विभागाने सांगितले की २०१८ ते २०२३ पर्यंत नवीन रस्त्यांवर १,८१५ कोटी ८५ लाख ५० हजार ९५९ रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर २०११ ते २०२३ पर्यंत दुरुस्तीच्या कामावर ४६ कोटी २० लाख ७९ हजार ४८३ रुपये कोटी खर्च करण्यात आले आहेत; तर रस्ते कामास विलंब केल्याबद्दल अनुक्रमे ५ आणि ८ कोटी रुपये दंड ठोठावला असून हा दंड वसूल केला गेला की नाही, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.
एक दशकाहून अधिक काळ बांधकाम सुरू असलेल्या या महामार्गावर २०१० पासून कोकण पट्ट्यातील २५०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या कामाची श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले पाहिजेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आणि एनएचएआयने संपूर्ण भारतभर केलेल्या चांगल्या कामाचा विचार करता, संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग केंद्र सरकारकडे सोपविण्याची वेळ आली आहे.
– जितेंद्र घाडगे, द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशन