राजापूर:- तालुक्यातील पाचल परिसरामध्ये बिबट्यापाठोपाठ आता गवारेड्यांचा त्रास वाढला आहे. परुळे येथील शेतकरी मनोहर सावंत यांच्या बागेतील सुमारे पन्नासहून अधिक काजूची झाडे मोडून गवारेड्यांनी नुकसान केले आहे.
लहरी आणि अनियमित पाऊस, मजुरांची वानवा, खर्च अन् उत्पन्नाचा न बसणारा मेळ आदी विविध कारणांमुळे शेती धोक्यात आली आहे. वारंवार बदलणार्या हवामानाचाही आंबा-काजू बागांवर परिणाम होत आहे. त्यामुळे चिंतातूर असलेल्या शेतकर्यांच्या चिंतेमध्ये गव्यांच्या उच्छादाने भर घातली आहे. गव्यांकडून होणाऱ्या त्रासाचा वन विभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून राजापूर तालुक्यामध्ये गव्यांचा वावर प्रकर्षाने जाणवू लागला आहे. वर्षभराच्या कालावधीमध्ये विविध भागांसह शेतशिवार, आंबा-काजूच्या बागा आणि अन्य परिसरामध्ये दिवसा-रात्री गवे आढळून येतात. तालुक्यामध्ये सुमारे दहा-पंधरा गवारेड्यांचे कळप आणि सुमारे शंभरहून अधिक गवे असल्याचा अंदाज आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.