उद्या होणार मस्जिदचे शानदार उद्घाटन
रत्नागिरी/जमीर खलफे:-रविवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ (हिजरी १४ शाबान १४४५) रोजी शब-ए-बरात या मोठ्या दिवसाचे अवचित्य साधुन दरिया मशिदीचे शानदार उद्घाटन होत आहे.
जुमा मस्जिद मुंबईचे मुफ्ती आणि फॅमिली फर्स्ट गाईडन्स सेंटरचे संस्थापक आणि सीईओ मुफ्ती अशफाक काझी दरिया मशिदीच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित आहेत.
अब्दुस शकुर इब्राहिम चिलवान यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी २०२३ रोजी जुनी दरिया मशिद शहिद करुन नवीन मशिदीचे काम चालु करण्यात आले होते. नवीन दरिया मशिद बांधण्यासाठी मरहुम शकुर चिलवान यांनी पुढाकार घेतला होता म्हणूनच आज आपल्याला एक नवीन आणि सुंदर अशी दरिया मशिद मिळाली आहे. दरिया मशिद बांधण्यासाठी शकुर चिलवान यांनी प्रचंड परिश्रम घेतले. सकाळ संध्याकाळ ते मशिदी जवळ उभे राहुन देखभाल करत असत. दरिया मशिद बांधण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचे रान केले. वयस्कर असुनही ते ऊन पाऊस थंडीची काळजी न करता प्रत्येक दिवशी न चुकता मशिदी जवळ येवून बांधकामावर लक्ष देत असत. एक सुंदर अशी दरिया मशिद बांधण्याचे त्यांचे मोठे स्वप्न होते. दरिया मशिद बांधण्याची पुर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मशिद बांधण्यासाठी लागणारा निधी गोळा करण्यापासून ते बांधकामाचे देखभाल करण्यापर्यंत ते सर्व काम शांतपणे ते करत होते.
आज या मशिदीचा शुभारंभ होत आहे आणि त्यांची आपल्याला उणीव भासत आहे. मशिदी चे अर्धे काम झाले होते आणि शकुर चिलवान यांचे २१ ऑगस्ट २०२३ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांना आपल्यातून जावून फक्त सहा महिने पूर्ण झाले असुन त्यांच्या स्वप्नातील नवीन दरिया मशिदीची सुरुवात ही आज त्यांच्या मृत्युनंतर अवघ्या सहा महिन्यानंतर होत आहे. काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. हे जरी खरे असले तरी, काही माणसं कायम स्मरणात राहतात, आठवणीत राहतात. म्हणूनच मरावे परी किर्ती रुपे उरावे असे म्हटले जाते. माणसाने शंभर वर्षे जिवंत राहण्यापेक्षा असे काम करावे की पुढील शेकडो वर्षे स्मरणात राहील. मरहुम शकुर चिलवान यांनी दरिया मशिदीसाठी दिलेले योगदान कोणीही विसरूच शकत नाही.
त्यांच्या जाण्यानंतर मशिदीचे काम पुर्ण करुन घेण्याची जबाबदारी गुंबद जमातीच्या ईतर सदस्यांवर आली. तेव्हा गुंबद जमातच्या सदस्यांनी व गुंबद मोहल्यतील इतर सामजिक कार्यकर्त्यांनी मिळुन मशिदीचे काम पूर्णस्तरावर घेऊन गेले. या मशिदीच्या बांधकामासाठी बऱ्याच कामगारांनी कष्ट केले. तसेच दरिया मशिदीच्या निर्माण कामासाठी ज्या ज्या लोकांनी आपले वेगवेगळ्या प्रकारचे योगदान दिले त्या सर्वांच्या योगदानामुळेच आज हे सर्व शक्य झाले आहे. दरिया मशिदीसाठी कोणी आपला अमूल्य वेळ देवुन बांधकामाची देखरेख केली, कोणी बांधकामासाठी लागणारे वेगवेगळे मटेरियल दिले, कोणी निधी/देणगी दिली, तर कोणी बांधकाम पुर्ण झाल्यानंतर मशिदीला लागणारे आतील व बाहेरील वेगवेगळे मटेरियल व वस्तू दिले. दरिया मशिदीसाठी वेगेगळ्या प्रकारच्या योगदानात आपल्या देशातील व विदेशातील लोकांचे योगदान लाभले आहे.
तसेच मशिद निर्मितीत कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांचे कारागीर यांचे ही योगदान आहे. आपल्या या सर्वांच्या योगदानामुळेच आज हे शक्य झाले आहे. दरिया मशिदीसाठी योगदान देणाऱ्या सर्व लोकांचे जमात-ऊल-मुस्लिमिन गुंबद मोहल्ला, सैतवडे कडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.