राजापूर:-तालुक्यातील पांगरे येथील पांडवकालीन लेणी परिसरात लागलेल्या वणव्यामुळे येथील ग्रामस्थांच्या आंबा व काजू कलमांची बागा जळून खाक झाल्याची घटना घडली. यामुळे येथील शेतकऱ्यांचे सुमारे 8 लाखांचे नुकसान झाले.
पांगरे येथील शेतकऱ्यांच्या आंबा, काजू कलम बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लागलेल्या आगीत माधव काजळे यांची 110 धरती आंबा कलम, महादेव झिंबरे यांची 100 काजू कलमे, बाळकृष्ण मोंडे यांची काजू बाग, सखाराम टेंबे यांची आंबा बाग जळून खाक झाली. आगीचे वृत्त कळताच येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग वेळीच आटोक्यात आणल्याने अन्य शेतकऱ्यांच्या बागा वाचल्या आहेत. यात चार शेतकऱ्यांचे सुमारे 8 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या संदर्भात माधव काजळे यांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दिली असून पंचनामा करण्यात आला आहे.