रत्नागिरी:-मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेला रत्नागिरी जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्याला शेततळ्यांसाठी २१० लक्ष्यांक असताना त्यापैकी पूर्ण प्रक्रिया होऊन केवळ १९ शेतकऱ्यांनी शेततळी खोदली आहेत.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्याला मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या योजनेसाठी २०१ एवढा लक्ष्यांक देण्यात आला आहे. या योजनेसाठी जिल्हाभरातून एकूण ३७४ शेतकर्यांनी अर्ज केले, मात्र त्यातील १९९ शेतकर्यांनी स्वतः आपले अर्ज रद्द केले, तर ४ अर्ज नाकारण्यात आले. उर्वरित १७१ अर्जांपैकी ६९ शेतकर्यांकडून कागदपत्रे अपलोड करणे प्रलंबित असून १०२ शेतकर्यांनी आपली कागदपत्रे अपलोड केलेली आहेत. त्यापैकी ८४ जणांना शेततळ्यासाठी पूर्वसंमती मिळाली असून त्यापैकी १९ शेतकर्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्षात शेततळी खोदली आहेत. शेततळी खोदणार्या १९ शेतकऱ्यांपैकी १४ शेतकऱ्यांना एकूण ५ लाख २२ हजार १०६ रुपयांचे अनुदान देण्यात आले असून उर्वरित ५ जणांची अनुदानाची प्रक्रिया सुरू आहे.